बीड : ‘‘सरपंच संतोष देशमुख प्रकरणात न्याय मिळत नसल्याने त्यांचे बंधू धनंजय यांनी स्वतःला संपविण्याचा निर्णय घेतला. संतोष यांच्या हत्येनंतर कुटुंब उघड्यावर पडले असताना त्यांना आधाराची गरज आहे. आतापर्यंत त्यांनी या प्रकरणात पूर्ण लक्ष घालायला हवे होत. मात्र, यापुढे तरी लक्ष घालून आरोपींना शिक्षा होईल, याची काळजी घ्यावी,’’ असे मत मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी व्यक्त केले.
सरपंच हत्या प्रकरणी वाल्मीक कराडवर ‘मकोका’ व खुनाचा गुन्हा नोंदविण्याच्या मागणीसाठी आज धनंजय देशमुख यांनी जलकुंभावर आंदोलन केले. जरांगे यांच्या मध्यस्थीनंतर त्यांनी आंदोलन तूर्त मागे घेतले.
जरांगे म्हणाले...‘‘देशमुख कुटुंबाला न्यायासाठी संघर्ष करावा लागतोय. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही कुटूंबासोबत आहोत. खंडणीतून हत्या झाल्याने खंडणीतील आरोपींवर खूनाचा गुन्हा नोंदवावा, खटला जलदगती न्यायालयात चालवावा, ॲड. उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करावी आदी मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याने संतोष देशमुख यांना न्याय मिळेल की नाही, अशी शंका येत आहे.’’
कराडच्या शस्त्र परवान्यावरील निर्णय प्रलंबित
सरपंच संतोष देशमुख यांची हत्या, पवनचक्की प्रकल्पातील दोन कोटींच्या खंडणीनंतर गंभीर गुन्हे नोंद असलेल्या ८० शस्त्रधारकांचे परवाने रद्द आणि साधे गुन्हे व न्यायालयात सुनावणी अंतिम टप्प्यात असणाऱ्या २० शस्त्रधारकांचे परवाने निलंबित झाले.
परंतु, या सर्व आरोप-प्रत्यारोप आणि गदारोळाच्या केंद्रस्थानी असलेल्या वाल्मीक कराडच्या शस्त्र परवान्याबाबत अद्यापही निर्णय झालेला नाही. दरम्यान, आरोपी विष्णू चाटे याला शनिवारपर्यंत (ता. १८) न्यायालयीन कोठडी सुनावली.