बीड : पवनचक्की खंडणी प्रकरणात वाल्मीक कराड आरोपी आहे. परंतु, खंडणी व खुनाच्या आठवडाभरापूर्वी त्याने केजमध्ये वाइन शॉप उघडण्यासाठी प्रक्रिया केल्याचे समोर आले आहे. कराडच्या नावावर केजमध्ये वाइन शॉपचा परवाना असून त्यासाठी केज नगरपंचायतीने नाहरकत प्रमाणपत्र दिले आहे.
मध्यंतरी सामाजिक कार्यकर्ते अॅड. अजित देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी नव्याने २० वाइन शॉप परवाने वाटप केल्याचे आरोप केले होते. यात वाल्मीकचाही परवाना असल्याचे समोर आले आहे.
संतोष देशमुख यांची हत्या ता. नऊ डिसेंबरला झाली, तर वाल्मीक कराडवर ता. ११ डिसेंबरला खंडणीचा गुन्हा नोंद झाला. तत्पूर्वी ता. दोन डिसेंबरला केज नगरपंचायतीने त्याला नाहरकत प्रमाणपत्र दिले होते.
दरम्यान, नियोजित जागेची खरेदी झालेली नसताना नाहरकत दिल्याचा आरोप मोहन गुंड यांनी केला. त्यामुळे हे नाहरकत प्रमाणपत्र रद्द करावे, यासाठीचे निवेदन गुंड यांच्यासह अरविंद थोरात, संदीप नाईकवाडे, अशोक रोडे, सूरज शेंडगे, प्रशांत गुंड, विजय चाळक, विशाल तपासे, वैभव चाळक राजेभाऊ गुंड व अक्षय तपसे आदींनी दिले.