- डी. एस. कुलकर्णी, जीवन कौशल्य प्रशिक्षक
‘तसे आम्ही फक्त ७ वर्षे जगतो.’ आहे की नाही धक्कादायक विधान? एका वेगळ्याच संदर्भात हे विधान ऐकले, बघितले. पुन्हा एका इंग्लिश शॉर्ट व्हिडिओचा संदर्भ देतो. प्रवासात एकटा असेल तर स्वतःमध्ये गुंतून राहण्यासाठी बहुतेक जण मोबाईलचा सद्उपयोग करतच असतो.
‘We leave only 7 years.’, या शीर्षकाचा होता तो व्हिडिओ. आत्मपरिक्षण करावयास लावणारा तो व्हिडिओ होता. आपण कसे जगतो. खाणे पिणे, झोप, रोजची आन्हिके, शाळा महाविद्यालय शिक्षण, नोकरी, लग्न, समारंभ, करमणुकीचे कार्यक्रम, अशा आयुष्यभराच्या सर्व बारीक-सारीक घटनांसाठी आपण आयुष्यभरात किती आणि कसा वेळ व्यतीत करतो, याचा हिशोब देऊन निवेदक आपल्यासाठी फक्त ७ वर्षे आहेत असे सिद्ध करून दाखवतो.
हिशोब करताना सांगितलेली कामे व्यर्थ आहेत असे तो म्हणत नाही. मानवजन्मात येऊन जी कृत्ये करावीच लागणार आहेत, ज्या जबाबदाऱ्या पाड पाडावयाच्या आहेत, त्या पूर्ण करायच्या आहेतच. ‘स्वतःसाठी केव्हा जगणार?’ असा बोचरा सवाल करायला मात्र तो विसरत नाही.
एकदा पुणे-सातारा असा बसने प्रवास करत होतो. शेजारी एक मध्यमवयीन गृहस्थ बसले होते. गप्पा मारताना, सातारा जिल्ह्यातील निसर्गरम्यतेचा विषय निघाला. मी विचारले, ‘यावर्षी ७ वर्षांनी कारवी नावाची वनस्पती फुललीए. काय मस्त दिसतो तो जांभळा डोंगर. नाही का?’ असे विचारता क्षणी ते सद्गृहस्थ तडकलेच माझ्यावर.
‘काय बघायचेय त्यात?’ असा तिरका प्रश्न मलाच विचारते झाले. दुसरीकडे एक जागा रिकामी होती. मी तिकडे जाऊन बसलो. वेरूळची लेणी बघून,’ काय बघायचेय त्या दगड-धोंड्यात?’ असा प्रश्न आम्हालाच विचारणाऱ्या आमच्या एका मित्राची आम्ही काय जाम खेचली होती, ते आठवले.
अशा व्यक्तींना विचारायचे आहे, ‘का हो एव्हढा राग निसर्गावर? तुमच्या शेपटीवर कधी पाय दिलाय का निसर्गाने?’ अशा व्यक्तीबद्दल राग, करुणा, भय, दया, ईर्ष्या वगैरे कुठलाच भाव आताशा दाटून येत नाही. अशा प्रकारचा रुक्षपणा एखाद्याच्या ठायी असू शकतो. असा साक्षात्कार मला मात्र नक्कीच झाला.
आयुष्यातील अत्यंत छोट्या छोट्या, फुकट मिळणाऱ्या आनंदाला मुकण्याची एखादी संधी अशा व्यक्तींची चुकू नये, अशीच इच्छा त्या निर्मिकाच्या चरणी व्यक्त केली. आयुष्य समृद्ध करण्यासाठी, करिअर वगैरे नियोजनपूर्वक साध्य करण्यासाठी, आयुष्याकडे सकारात्मकरित्या बघण्याचा भाव स्वभावात असावा लागतो. आणि निरागस निष्पाप निसर्गच हा भाव पुरवतो, अशी माझी श्रद्धा आहे.