उत्कृष्ट 'फ्रेम' हा निरीक्षणाचा 'रियाज'!
esakal January 15, 2025 09:45 AM

- मिलिंद ढेरे, छायाचित्रकार

कॅमेरा प्रत्येकाच्या हातात असला, तरी सामान्य व्यक्तीने आणि अनुभवी छायाचित्रकाराने काढलेली छायाचित्रे पूर्णतः वेगळी असतात. असं का होतं? कारण, सामान्य माणसांसाठी जी ‘हौस’ असते, तो छायाचित्रकाराचा ‘ध्यास’ असतो! तो ध्यास घेण्यासाठी, तशी कलाकृती निर्माण करण्यासाठी फक्त तंत्रसाक्षर होणं गरजेचं नसतं, तर आवश्यक असतं स्वतःची दृष्टी विकसित करणं आणि सातत्याने काम करत राहणं. छायाचित्रण ही अवाह्यत सुरू राहणारी प्रक्रिया आहे.

छायाचित्रणाची सुरुवात कशी करावी?

हल्ली गोष्टी बऱ्याच सोप्या झाल्या आहेत. मात्र, त्यामुळे स्पर्धा व आव्हानेदेखील वाढली आहेत. निकॉन, सोनी, कॅनॉन यांसारख्या चांगल्या कंपन्यांपैकी कोणत्याही कंपनीचं बेसिक मॉडेल घेऊन तुम्ही कामाला सुरुवात करू शकता. वन्यजीव म्हणजे वाइल्ड फोटोग्राफी, व्यक्तिचित्रण, जाहिरातींसाठी केली जाणारी कामे, इंडस्ट्रिअल म्हणजे उद्योग क्षेत्रासाठी विविध उत्पादनांची छायाचित्रे टिपणं असे विविध प्रकारे उपलब्ध आहेत.

यापैकी तुम्ही ज्यात रमता त्यात काम करा. अत्याधुनिक लेन्स बाजारात सहज उपलब्ध असल्याने काम थोडं सोपं होतं. इंडस्ट्रीसाठी काम करताना ती उत्पादने निर्जीव असतात, त्यांची चांगली मांडणी करून तुम्हाला त्यात ‘जीव’ ओतावा लागतो हे लक्षात ठेवा. स्वयंशिस्त, नावीन्याचा ध्यास आणि कल्पकतेला पर्याय नसतो. रघुराय, बेदी बंधू, अशोक दिलवाली यांसारख्या उत्कृष्ट छायाचित्रकारांच्या कामाचा अभ्यास करत राहा.

छायाचित्रकाराने काढलेले छायाचित्र कायम वेगळेच भासते, असं का?

कोणत्याही उत्कृष्ट ‘फ्रेम’मागे काही वर्षांचा अभ्यास, सराव असतो. एखादी गोष्ट दिसल्यावर तुम्ही ती पटकन मोबाइलमध्ये टिपली, तर तो क्षण टिपल्याचं समाधान मिळू शकतं. मात्र, निरीक्षण करून विचाराअंती योग्य त्या रंगसंगतीचा वापर करून मग जे ‘क्लिक’ होतात, त्यातून एखादी मनाजोगती ‘फ्रेम’ हाती लागते.

तांत्रिक शिक्षण कोणालाही घेता येणं शक्य आहे, परंतु उत्कृष्ट छायाचित्रकार होण्यासाठी निरीक्षणशक्ती, रंगसंगती व मांडणीचा अभ्यास आणि प्रयोगशीलता या गोष्टी सातत्याने करत राहाव्या लागतात. निरीक्षणशक्ती जेवढी छान, सजग, सुंदर तितके तुमचे ‘कंपोजिशन्स’ छान, सुंदर होतात.

‘मोबाइल फोटोग्राफी’कडे तुम्ही कसे पाहता?

मोबाइल पटकन कुठेही नेता येतो आणि क्षणात त्यावर फोटो काढता येतो यात वाद नाही. मात्र, ते फोटो हे केवळ आठवण किंवा संदर्भमूल्य घेऊन येणारे असतात असं मला वाटतं. मात्र, तुम्हाला जर एखाद्या प्रसंगातला, वस्तूतला, व्यक्तीतला ‘भाव’ शोधून त्याची मांडणी अचूकपणे करायची असेल, तर त्यासाठी कॅमेरा लागतो व मनाजोगती ‘फ्रेम’ साकारण्यासाठी तेवढा विचारही करावा लागतो. सहज गाणं गुणगुणणं आणि मैफलीत सादर करणं यात फरक आहेच. छायाचित्रकाराने गरज व वेळ ओळखून साधनांचा वापर करायला हवा.

‘क्लिक’ करण्याआधी...

  • आजूबाजूच्या वर्तमानाशी स्वतःला जोडून घ्या, स्वतःची संवेदनशीलता वाढवा.

  • फोटो ‘करेक्शन’ करणं आणि मूळ फोटोच बदलणं यात फरक आहे. मूळ दृश्य बदलेल असं काहीही करू नका.

  • नवनवीन तंत्रज्ञान जरूर आत्मसात करा, पण त्याच्या आहारी जाऊ नका.

  • पूर्ण वेळ छायाचित्रकार होण्याचा निर्णय घेताना आर्थिक बाजूचाही विचार करा.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.