ढिंग टांग : दावोस दौऱ्यावर जाताना...!
esakal January 15, 2025 09:45 AM

स्थळ : अज्ञात. वेळ : अज्ञात. भेट : राजरोस दिवसाउजेडी!

नानासाहेब : (उंच पाठीच्या खुर्चीत बसून) भेटीची वेळ ठरली होती, अजून कोणीच कसं नाही आलं?

भाईसाहेब : (तेवढ्यात एण्ट्री घेत) आलोय की! ठाण्याहून यायला उशीर झाला! भयंकर ट्राफिक झालाय बुवा!

दादासाहेब : (पाठोपाठ एण्ट्री घेत) मी बारामतीहून आलो सुसाट! आहे कुठे इतका ट्राफिक?

नानासाहेब : (सबुरीनं घेत) असू दे, असू दे! अडीच तास उशीर म्हणजे काहीच नाही! पूर्वी आपण मध्यरात्री गपचूप भेटायचो…नै!!

भाईसाहेब : (चुकल्या चुकल्यागत) हो ना, दिवसाढवळ्या भेटायला आता कसंतरीच वाटतं! तेव्हा मी दुपारचा लंच रात्री आणि रात्रीचा डिनर दुपारी बाराला घ्यायचो!

दादासाहेब : (घड्याळाकडे बघत) बाबांनो, आपण काय शिळोप्याच्या गप्पा मारायला भेटलोय का? लौकर आटपा, मला कामं आहेत!!

नानासाहेब : (खुशीत गाजरं खात) मला तर इतकं मोकळं वाटतंय की विचारु नका! यापुढे पाच वर्ष हुडीबिडी घालून वेषांतरं करायची गरजच पडणार नाही! हाहा!!

दादासाहेब : (नाराजीनं) फोडायच्या त्या पार्ट्या फोडून झाल्या, आता कशाला वेषांतरं करायची? जाऊ दे…आता झालं ना मनासारखं? कामाचं बोला!

भाईसाहेब : (हाताची घडी घालत) मला काही बोलायचंच नाही मुळी!

दादासाहेब : (समजूत घालत) शपथविधी झाल्यानंतर तुम्ही जी गुळणी धरलीत, ती अजूनही कायम आहे! अहो, बोला तरी! सीएम झाला नाहीत, त्याचं इतकं काय मनाला लावून घेता? माझ्याकडे बघून तरी मजेत राहा!!

नानासाहेब : (दाद देत) खरंय, खरंय! दादासाहेबांची राजकीय परिपक्वता बघूनच माझी आणि त्यांची वेवलेंग्थ जुळते, असं मी परवा मुलाखतीत म्हटलं होतं!

भाईसाहेब : (गंभीरपणाने) तेव्हा मी सीएम म्हणजे कॉमन मॅन होतो, आता डीसीएम म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन आहे!!

दादासाहेब : (कुत्सितपणाने) कॉमन मॅन आहात हे खरं!!

नानासाहेब : (विषय तातडीने बदलत) मी येत्या आठवड्यात दावोसला चाललो आहे! सात-आठ लाख कोटी घेऊन येईन! मग बघू काय करायचं ते!!

भाईसाहेब : (अनाहूत सल्ला देत) दहा-बारा लाख कोटी आणा, म्हणजे आपली लाडकी बहीण योजना व्यवस्थित सुरु राहील!

दादासाहेब : (जीभ चावून) सात-आठ लाख कोटी आणणार? येवढ्या पैशांचं करायचं काय?

नानासाहेब : (अर्थशास्त्रीय सुरात) तेवढ्या पैशांची गुंतवणूक आणायला चाललोय मी दावोसला! महाराष्ट्र परकी गुंतवणुकीच्या क्षेत्रात एक नंबरवरच राहिला पाहिजे!

भाईसाहेब : (खंतावून) गेल्या वर्षी मीसुद्धा गेलो होतो दावोसला! तिथे माझी ओळख आहे चांगली! हम मोदीजी के लोग है, असं मी दावोसच्या लोकांना ऑलरेडी सांगून आलोय! पाच-सात लाख कोटी तर असेच मिळतील!!

दादासाहेब : (कपाळाला हात लावत) इथे आहेत त्या योजना गुंडाळायला लागणार की काय अशी परिस्थिती आहे! मी अर्थमंत्री आहे राज्याचा, हे विसरु नका!

भाईसाहेब : (नाराजी दर्शवत) परवा दालनाची सजावट करण्यासाठी फुलदाणी आणायची होती, पण अर्थखात्यानं आमची मागणी नामंजूर केली- निधीअभावी फुलदाणीवरील खर्चास मान्यता देता येत नाही, म्हणे!!

नानासाहेब : (आश्वासन देत) दावोसहून आलो की सजवा तुमची दालनं! ओके? चला, निघतो!

दादासाहेब : (नरमाईनं) हॅप्पी जर्नी! तुम्ही परदेशी जाताहात तर मी बारामतीला चक्कर टाकून येईन म्हणतो!

भाईसाहेब : (थंडपणाने) मी तर परवा आमच्या ठाण्यात रिक्षा चालवून बघितली! प्रॅक्टिस ठेवली पाहिजे! जमेल, जमेल! बराय!!

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.