बीड : ‘‘मस्साजोगचे (ता. केज) सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी सुटले तर ते आपल्याला व कुटुंबीयांना संपवतील. आरोपींनी मारण्यापेक्षा आपणच मरतो,’’ असे म्हणत दिवंगत सरपंच संतोष यांचे बंधू धनंजय देशमुख आज गावातील पाण्याच्या टाकीवर जाऊन बसले.
वाल्मीक कराडवर ‘मकोका’ तसेच हत्येच्या गुन्ह्याचे कलम लावावे, अशी मागणी त्यांनी केली. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे व पोलिसांच्या विनंतीनंतर चार तासांनी धनंजय यांनी आंदोलन तूर्त स्थगित केले. मात्र, मागणी मान्य झाली नाही तर उद्या (ता. १४) पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
वाल्मीक कराडला हत्येच्या प्रकरणात आरोपी करून त्याच्यावर ‘मकोका’ लावण्याच्या मागणीसाठी धनंजय देशमुख यांनी टॉवरवर चढून आत्मदहनाचा इशारा रविवारी (ता. १२) दिला होता. त्यामुळे पोलिस सावध झाले होते. परंतु, पोलिसांना चकवा देत आज सकाळीच धनंजय देशमुख गायब झाले.
पोलिस शोध घेत असतानाच ते गावातील पाण्याच्या टाकीवर गेले. हत्या प्रकरणातील आरोपींकडून आपलीही हत्या होण्याची शक्यता व्यक्त करत त्यांनी स्वत:ला संपवून घेण्याचा इशारा दिला.
आंदोलन परिसरात महिलांसह ग्रामस्थांची मोठी गर्दी जमल्याने अंबाजोगाईच्या अपर पोलिस अधीक्षक चेतना तिडके, केजचे सहाय्यक पोलिस अधीक्षक कमलेश मिना पोलिस फौजफाट्यासह दाखल झाले. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील हेही मस्साजोगला आले.
त्यांनी धनंजय देशमुख यांना टाकीवरून खाली उतरण्याची विनंती केली, प्रशासनाशीही संपर्क साधला. चार तासांनी धनंजय खाली उतरले. मागणी मान्य झाली नाही तर पुन्हा मंगळवारी (ता. १४) आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे.
सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर २०२४ ला हत्या झाली. या प्रकरणात सात जणांवर गुन्हा नोंद झाला आहे. खुनाच्या दिवशी मस्साजोग येथीलच सिद्धार्थ सोनवणे याने आरोपींना संतोष देशमुख यांची टिप दिल्याचे तपासातून समोर आल्याने ‘सीआयडी’ने त्यालाही अटक केली आहे.
दरम्यान, अवादा कंपनीच्या पवनऊर्जा प्रकल्पासाठी धमकावून दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली म्हणून वाल्मीक कराडसह हत्या प्रकरणातील विष्णू चाटे, सुदर्शन घुले या तिघांवर गुन्हा नोंद आहे.
आरोपींवर ‘मकोका’ लावण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनात केली होती. त्याची अंमलबजावणी झाली. परंतु हत्या प्रकरणातील आरोपींवरच ‘मकोका’चे कलम वाढले आहे. खंडणी प्रकरणातील कराडवर ‘मकोका’ लागला नाही. त्याला हत्येच्या गुन्ह्यात आरोपी करुन ‘मकोका’ लावण्याची मागणीसाठी आंदोलने होत आहेत.
माझ्या वडिलांना रस्त्यावरून उचलून नेऊन त्यांची हत्या केली. आता काकांना काही झाले तर आम्ही काय करायचे? आरोपींचे निकटवर्तीय पोलिस ठाण्यात आम्हाला धमक्या देतात. धमक्या देणाऱ्यांवरही कारवाई व्हावी.
- वैभवी देशमुख (संतोष देशमुख यांची कन्या)