ढिंग टांग : तीळगुळ पॉलिटिक्स…!
esakal January 14, 2025 11:45 AM
ढिंग टांग

स्थळ : मातोश्री महाल, वांद्रे संस्थान. वेळ : भोगीचे भोग!

राजाधिराज उधोजीमहाराज आपल्या आलिशान महालातील अंत:पुरात अस्वस्थपणे येरझारा घालत आहेत. सद्य परिस्थितीवर तोडगा काय काढावयाचा, या चिंतेने त्यांस ग्रासिले आहे. तलवारीकडे बघोन ते मधूनच ‘अहह’ ऐसे दु:खोद्गार काढितात, मग पुनश्च येरझारा सुरु करतात. अब आगे…

उधोजीराजे : (ताडकन मागे वळोन) कोण आहे रे तिकडे?

संजयाजी फर्जंद : (तांतडीने येवोन मुजरा क़रत) कशापायी याद केलीत, राजे?

उधोजीराजे : (खंतावून) कित्ती वेळा सांगितलं तुम्हाला…तुमची याद आम्ही कशापायी करु? याद जिची येत्येय, ती कमळाबाई रुसून दूर गेली आहे…

संजयाजी फर्जंद : (उगीच इमोशनल होत्साते) बाई स्वभावानं नाही म्हटलं तरी बऱ्या होत्या…त्यांच्यामुळे घराला घरपण होतं..!

उधोजीराजे : (चिडून) तुम्हीच कोलदांडा घातलात, म्हणोन हा प्रसंग गुदरला! तुमची ती जीभ आवरली असतीत, तर इतका बेबनाव झालाच नसता आमच्यात..!

संजयाजी फर्जंद : (निरागसपणाने) का गरीबाला फासावर देताय, राजे? आपलंच नशीब फुटकं म्हणून ही आफत ओढवली!!

उधोजीराजे : (उद्विग्न मनःस्थितीत) आम्ही इथे बांदऱ्यात बसून ऱ्हायलो, आणि कमळाबाई शिर्डीत येवोन गेल्या...!!

संजयाजी फर्जंद : (दुप्पट निरागसपणाने) छ्या, त्यांचा आदिलशहा नावाचा सरदार येऊन गेला, म्हणे! असले बाजारबुणगे कितीएक येतात, आणि जातात!

उधोजीराजे : (धडपडून उठत) तोंडात बोळा कोंबीन! किती बोलाल? किती बोलाल? तुमच्या या भोंग्यानेच सगळा घात झालाय! कमळाबाईंचे एकनिष्ठ सरदार आहेत ते! त्यांच्याबद्दल ही अशी भाषा? शी:!!

संजयाजी फर्जंद : बरं ऱ्हायलं, चुकलं! तुम्हीच म्हणायचात की, या मोगलांना पाणी पाजीन वगैरे!! मोदीजींना तर तुम्ही-

उधोजीराजे : (घाईघाईने) जाऊ दे ते आता! झालं गेलं गंगेला मिळालं!

संजयाजी फर्जंद : (आणखी काडी टाकत) राजे, तुम्ही त्या मोदीजींना घाम फोडला होता ना? याच आदिलशाहीची कबर खोदणार होता ना? एक तर मी राहीन, नाही तर तू…असं तुम्हीच सुनावलं होतं ना? मग अचानक का हे मनपरिवर्तन?

उधोजीराजे : (खचून जात) आमचं ते ३१ जुलैचं भाषण हा महाराष्ट्र जितक्या लौकर विसरेल तेवढं बरं!! राजकारणात होतो कधी तरी असा घोळ!! पण यापुढे आम्ही ही भाषा खपवून घेणार नाही! सध्या आम्ही असू राजकीय विरोधक, पण…पण…(काही न सुचून) जाऊ दे!

संजयाजी फर्जंद : (आज्ञाधारकपणाने) जशी आपली आज्ञा, राजे! यापुढे मोदीजींना मी देव मानीन! मोटाभाईंना तर मी देवाचा अवतार मानीन! फडणवीसनानांना मी वंदनीय गुरुवर्य म्हणेन! एकही वेडावाकडा शब्द या मुखातून बाहेर निघणार नाही, याची खात्री बाळगा! पण त्यामुळे काय साध्य होणार आहे? एकदा दुभंगलेलं मन पुन्हा सांधलं जात नाही, एकदा तुटलेली फांदी परत जोडता येत नाही!

उधोजीराजे : (कासावीस होत्साते) खिळा तर मारता येईल ना? मग झालं तर…

संजयाजी फर्जंद : (मुत्सद्दीपणाचा आविर्भाव आणत) यापुढे आपली रणनीती काय असेल, राजे? त्यानुसार आपल्या तलवारबहाद्दर शिलेदारांना सांगावा धाडावा लागेल! फौजेची जमवाजमव करावी लागेल! दारुगोळा खात्याला प्रॉडक्शन वाढवायचा आदेश द्यावा लागेल!

उधोजीराजे : (चिडून) खामोश! दारुगोळा कशाला हवा?

संजयाजी फर्जंद : (गोंधळून) युद्ध म्हटलं की दारुगोळा नको?

उधोजीराजे : (चतुर चेहऱ्याने) खुळे की काय? हे युद्ध आम्ही दारुगोळ्यानं नव्हे, तिळगुळानं जिंकण्याचा डाव टाकतो आहोत!

हॅपी मकर संक्रांती!!

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.