तमिळ चित्रपट अभिनेते नंदामुरी बालकृष्ण यांचा डाकू महाराज चित्रपट प्रदर्शित झाला आहे. दोन दिवसांत या चित्रपटाने चांगली कमाई केली. मात्र, सध्या हा चित्रपट चर्चेत आला तो त्यातील दाबीडी दाबीडी या गाण्यामुळे. या गाण्यावरची एक रील सोशल मीडियावर व्हायरल होतेय. यामध्ये अभिनेत्री उर्वशी रौतेला आणि नंदामुरी बालकृष्ण हे दोघेही या गाण्यावर नाचताना दिसतात. पण चाहते यांच्या डान्स स्टेपवर प्रचंड नाराज झाले आहेत. यावेळी लोकांनी अभिनेते नंदामुरी बालकृष्ण यांच्यावर टीका केली आहे.
डाकू महाराज हा चित्रपट 12 जानेवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. दरम्यान, 100 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने दोन दिवसातच 56 कोटी रुपयांची कमाई केली. त्यामुळे जबरदस्त कमाईसाठी सक्सेस पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीत उर्वशी रौतेलाही उपस्थित होती. यावेळी उर्वशीने नंदामुरी बालकृष्णसोबत डान्स केला आहे. या डान्सवरून नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करायला सुरुवात केली आहे.
उर्वशीने हा व्हिडीओ स्वत: आपल्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेते नंदामुरी त्यांच्या दाबीडी दाबीडी या गाण्याची हुकस्टेप करताना दिसले. मात्र यावेळी उर्वशी काहीशी अस्वस्थ होताना दिसली. हा व्हिडीओ पाहून लोक संतप्त झाले आहेत. या व्हिडिओवर लोक खूप कमेंट करत आहेत.