कालकाजी मतदारसंघात रंगतदार लढत अपेक्षित
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी मंगळवारच्या मकरसंक्रांतीचा मुहूर्त साधत कालकाजी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सोमवारी त्यांना उमेदवारी अर्ज दाखल करायचा होता पण रोड शोला जास्त वेळ लागल्याने नामांकन अर्ज भरण्याची प्रक्रिया मंगळवारपर्यंत पुढे ढकलण्यात आली. आतिशी यांनी सोमवारी सकाळी रोड शो सुरू करण्यापूर्वी आप नेते मनीष सिसोदिया यांच्यासोबत गिरीनगर येथील गुरुद्वारा श्री गुरु गोविंद साहिबला भेट दिली. तसेच रविवारी सायंकाळी त्यांनी माँ कालकाजी मंदिरात प्रार्थना करत आपल्या विजयासाठी आशीर्वाद मागितले.
आतिशी यांच्या कालकाजी मतदारसंघातील लढत ह्यावेळी रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत. येथून काँग्रेसने महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा अलका लांबा यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपचे उमेदवार रमेश बिधुरीही सध्या बरेच चर्चेत आले आहेत. दक्षिण दिल्लीचे माजी खासदार आणि तुघलकाबादचे तीनवेळा आमदार राहिलेले रमेश बिधुरी हे आपल्या मजबूत राजकीय रेकॉर्डसाठी ओळखले जातात. 2003, 2008 आणि 2013 मध्ये त्यांनी निवडणूक जिंकली होती. दिल्ली विधानसभा निवडणुका 5 फेब्रुवारी रोजी होणार असून निकाल 8 फेब्रुवारी रोजी जाहीर होतील.