IND vs AUS : पॅट कमिन्सपेक्षा जसप्रीत बुमराहच सरस, आयसीसीकडून शिक्कामोर्तब, यॉर्कर किंगचा बहुमान
GH News January 14, 2025 09:11 PM

टीम इंडियाचा यॉर्कर किंग जसप्रीत बुमराहने याला आनंदाची बातमी मिळाली आहे. टीम इंडियाच्या प्रमुख गोलंदाजाने 2 खेळाडूंना मागे टाकत मोठा बहुमान मिळवला आहे. जसप्रीत बुमराह हा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याच्यापेक्षा सरस असल्याचं आयसीसीनेही मान्य केलं आहे. जसप्रीत बुमराहने आयसीसी प्लेअर ऑफ मंथ डिसेंबर 2024 हा पुरस्कार जिंकला आहे. बुमराहने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स आणि दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज डेन पीटरसन या दोघांना पछाडत हा पुरस्कार जिंकला आहे. आयसीसीने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.

आयसीसी एका महिन्यातील कामगिरीच्या जोरावर टॉप 3 खेळाडूंना ‘प्लेअर ऑफ मंथ’ पुरस्कारासाठी नामांकन देतं. त्यानुसार आयसीसीने डिसेंबर महिन्यातील पुरस्कारासाठी पॅट कमिन्स, जसप्रीत बुमराह आणि डेन पीटरसन या तिघांना नामांकन देण्यात आलं होतं. मात्र प्रमुख लढत ही जसप्रीत बुमराह विरुद्ध पॅट कमिन्स अशीच होती. त्यामुळे या दोघांपैकी हा पुरस्कार कोण जिंकणार? याकडे साऱ्यांचं लक्ष होतं. मात्र बुमराहने बाजी मारत आपण सरस असल्याचं सिद्ध करुन दाखवलं आहे.

टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यात डिसेंबर महिन्यात बॉर्डर गावसकर ट्रॉफी खेळत होती. पॅट कमिन्सने या मालिकेत ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व केलं. तर बुमराहने पहिल्या आणि पाचव्या कसोटीत टीम इंडियाचं नेतृत्व केलं. बुमराहच्या नेतृत्वात टीम इंडियाने या 5 सामन्यांच्या मालिकेत विजयी सलामी देत 1-0 अशी आघाडी घेतली. मात्र ऑस्ट्रेलियाने ही मालिका 3-1 ने जिंकली. या मालिकेत दोन्ही खेळाडूंनी बॉलिंग आणि बॅटिंगने दमदार कामगिरी केली होती. त्यामुळे या दोघांमध्येच या पुरस्कारासाठी रस्सीखेंच असणार हे स्पष्ट होतं. मात्र या सामन्यातही बुमराहनेच बाजी मारलीय.

जसप्रीत बुमराह प्लेअर ऑफ द मंथ डिसेंबर 2024

बुमराहची डिसेंबर महिन्यातील कामगिरी

यॉर्कर किंगने डिसेंबर महिन्यात बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील एकूण 3 सामने खेळले. बुमराहने या 3 सामन्यांमध्ये 14.22 च्या एव्हरेजने एकूण 22 विकेट्स घेतल्या. तसेच बुमराहने या मालिकेत एकूण 32 विकेट्स घेतल्या. बुमराहला या कामगिरीसाठी ‘मॅन ऑफ द सीरिज पुरस्कार’ देण्यात आला. बुमराहने बॉलिंगसह निर्णायक क्षणी बॅटिंग करत गेमचेंजिग भूमिका बजावली.

बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीला मुकणार?

दरम्यान बुमराहला सिडनीत झालेल्या पाचव्या आणि अंतिम सामन्यात पाठीत त्रास झाला. त्यामुळे बुमराहला दुसऱ्या डावात बॉलिंग करता आली नाही. त्यामुळे कांगारुंना सहज विजय मिळवता आला. बुमराहला त्यानंतर आता पाठीच्या दुखापतीमुळे चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत खेळता येणार नसल्याचं म्हटलं जात आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.