भंडारा : गेल्या काही काळापासून महाराष्ट्रात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये शाब्दिक टीकाटिपण्णी पाहायला मिळत आहे. अशामध्ये शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस नेते नाना पटोले यांच्यावर टीका केली होती. त्यावरून आता नाना पटोले यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत हा आमचा विषय कधी राहिला नाही आणि राहणार ही नाही, अशा शब्दात त्यांनी टोला लगावला. तसेच ते पुढे म्हणाले की, “देशासमोर मूळ प्रश्न आज देशातील शेतकरी अडचणीत आला आहे. देशाला कसे सुरक्षित करता येते? यावर आमचा भर आहे.” असे ते पुढे म्हणाले. (Nana Patole Congress criticized Sanjay Raut Shivsena UBT)
हेही वाचा : Aishwarya Narkar : संसारात पैशांची बचत कशी करावी, ऐश्वर्या नारकरांनी सांगितला अनुभव
– Advertisement –
“बीड आणि परभणीचे प्रकरण हे सरकार पुरस्कृत आहे. सरकारजवळ अद्यावत माहिती आहे. जनतेचे प्रश्न विचलित करण्यासाठी गुन्हेगारांना वाचविण्यासाठी हा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून चालवला आहे,” अशी टीका नाना पटोले यांनी केली. तसेच, संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवर ते म्हणाले की, “महागाईमुळे जनता हैराण आहे, देशाच्या सीमा चीन रोज आपल्या ताब्यात घेत आहे. त्यामुळे देश धोक्यात आला आहे. देशाची लोकशाहीदेखील धोक्यात आला आहे. काँग्रेससमोर देश पहिले आणि मग हे छुटूक मुटूक राजकारण,” असे म्हणत त्यांनी संजय राऊत हा आमचा विषय कधी राहिला नाही आणि राहणार नाही, असे म्हणत टोला लगावला.
भंडारा येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुढे म्हणाले की, “बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे. महाराष्ट्रात अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये यासाठी या घटनेतील आरोपींना कठोर शिक्षाच झाली पाहिजे. बीड आणि परभणीच्या घटनेने महाष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासला गेला आहे. दोन्ही घटनांवर भाजपा युती सरकारचा जो तमाशा सुरू आहे, त्याबद्दल महाराष्ट्राची जनता भाजपा सरकारला माफ करणार नाही.” असे म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला. “विधानसभा निवडणुकीत माता भगिनींची मते घेण्यासाठी लाडकी बहिण योजना सुरु करून सरसकट सर्व भगिनींना 1500 रुपये दिले. आता या सरकार स्थापन झाल्याने भाजपला बहिणींची गरज राहिलेली नाही, म्हणूनच बहिणींना धमक्या देऊन पैसे परत घेण्याची भाषा केली जात आहे, हा विश्वासघात आहे. भाजप युती सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करत सरसकट सर्व बहिणींना दरमहा 2100 रुपये द्यावेत,” असेही ते पुढे म्हणाले.