दिल्ली उच्च न्यायालयाकडून दिलासा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आम आदमी पक्षाचे माजी नगरसेवक ताहिर हुसैनने दिल्ली उच्च न्यायालयात जामीन याचिका दाखल केली असून यावर सोमवारी सुनावणी झाली. ताहिर हा दिल्ली दंगलीप्रकरणी तुरुंगात आहे. ताहिर तुरुंगातूनच स्वत:चा उमेदवारी अर्ज दाखल करू शकतो असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
कैद्यांनी तुरुंगातूनच निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण केल्याची अनेक उदाहरणे असल्याचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल चेतन शर्मा यांनी ताहिरच्या याचिकेवर पोलिसांच्या वतीने उत्तर देताना म्हटले आहे. ताहिर तुरुंगातूनच विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरू शकतो अशी टिप्पणी न्यायाधीश नीना बंसल कृष्णा यांनी केली. यावर आरोपीच्या वकिलाने ताहिरला एका राष्ट्रीय पक्षाने उमेदवारी दिली असून अर्ज दाखल करण्यासोबत प्रचार अन् स्वत:च्या संपत्तीची घोषणाही करावा लागणार असल्याचा युक्तिवाद केला.
ताहिर हुसेन मार्च 2020 पासून तुरुंगात आहे. संबंधित न्यायालयांकडून दोन अन्य प्रकरणांमध्ये अंतरिम जामीन मागण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे त्याच्या वकिलाने म्हटले. यावर न्यायालयाने पुढील सुनावणी मंगळवारी घेतली जाणार असल्याचे सांगितले.
ताहिर हुसैनने मागील आठवड्यात याचिका दाखल करत मुस्तफाबाद मतदारसंघात एआयएमआयएमच्या तिकिटावर निवडणूक लढण्यासाठी 14 जानेवारी ते 9 फेब्रुवारीपर्यंत अंतरिम जामीन मागितला होता. उमेदवारी अर्ज भरणे, बँक खाते उघडणे आणि प्रचार करण्यासाठी त्याने दिलासा मागितला होता.