Premachi Goshta 2: प्रेमाचा इफेक्ट असणारी, मनातली स्पेशल गोष्ट; 'प्रेमाची गोष्ट 2' लवकरच होणार प्रदर्शित
Saam TV January 14, 2025 10:45 PM

Premachi Goshta 2: मराठी चित्रपटसृष्टीत अनेक गाजलेल्या प्रेमकथांची निर्मिती करणारे एव्हरेस्ट एंटरटेनमेंट आता मकर संक्रांतीच्या निमित्ताने आणखी एका नवीन प्रेमकथेची घोषणा करत आहेत. ‘मुंबई-पुणे-मुंबई’, ‘मुंबई-पुणे-मुंबई २’, ‘मुंबई-पुणे-मुंबई ३’, ‘प्रेमाची गोष्ट’, आणि ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटांतून प्रेमाच्या अनेक छटा दाखवणारे दिग्दर्शक सतीश राजवाडे आता ‘प्रेमाची गोष्ट २’ हा चित्रपट घेऊन येत आहेत.

प्रेमाचे नशीब, नशीबातील प्रेम बदलणारी एक नवीन गोष्ट ‘प्रेमाची गोष्ट २’ मध्ये पाहायला मिळणार आहे. प्रेम कधी-कधी नशिबाशी खेळतं आणि कधी नशीब प्रेमाला नव्या वाटेवर घेऊन जातं, या संकल्पनेवर आधारित ही प्रेमकथा आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना नात्यांचा रंजक प्रवास पाहायला मिळेल.

दिग्दर्शक म्हणतात, “प्रेक्षकांनी आमच्या आधीच्या चित्रपटांना खूप प्रेम दिले. आता एक अशीच नवी प्रेमकथा ‘’ या चित्रपटात पाहायला मिळेल. काळाबरोबर पुढे जाणं महत्वाचं आहे. त्यामुळे कथानकाचे सादरीकरणही त्याला साजेसं हवं. यात प्रेमकथाच नाही तर ती सादर करायची पद्धतही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून घडवली आहे. त्यामुळे ही प्रेमकथा काळाच्या पुढे जाणारी नवीन युगाची प्रेमकथा ठरणार आहे. प्रेमाची एक वेगळी बाजू यात दिसेल. प्रेम आणि नशीब जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याचा परिणाम फार वेगळा असतो. प्रेम आणि नशिबाचा हा मनोरंजनात्मक प्रवास प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.”

एव्हरेस्ट एंटरटेनमेंट सादर करत असलेल्या ‘प्रेमाची गोष्ट २’ या चित्रपटाचे दिग्दर्शन सतीश राजवाडे यांनी केले असून निर्माते संजय छाब्रिया आहेत तर सह निर्माते अमित भानुशाली आहेत. सतीश राजवाडे आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंट यांनी नेहमीच प्रेक्षकांना पैसा वसूल करणारे चित्रपट दिले आहेत. त्यामुळे हा चित्रपटही प्रेक्षकांसाठी एक खास भेट ठरणार आहे. 'प्रेमाची गोष्ट २' येत्या जून २०२५ मध्ये प्रदर्शित होईल. मात्र यातील कलाकारांची नावे अद्याप गुलदस्त्यात असल्याने हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांमध्ये अधिक उत्सुकता निर्माण झाली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.