गेल्या आठवड्याभरात धरण पाणी पातळीत जवळपास अर्धा मीटरहून अधिक कमी झाली. त्यामुळे मुख्य भिंतीत बारा मीटर खोलीपर्यंत विंधन विवरे घेण्याचे काम सुरू झाले आहे.
राधानगरी : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित काळम्मावाडी धरण गळती (Kalammawadi Dam Leak) प्रतिबंधक उपाययोजना कामाला अखेर आजपासून प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. ग्राउंटिंगसाठी धरणाच्या मुख्य भिंतीत विंधन विवरे (ड्रिलिंग) घेण्याचे प्राथमिक टप्प्यातील काम हाती घेण्यात आले आहे. अद्यापही धरण पाणीपातळी आणि पाणीसाठा अधिक असल्याने, मुख्य भिंतीत बारा मीटर खोलीपर्यंत विवरे घेणेच शक्य होणार आहे.
सध्या पाणीपातळी ६३९ मीटर इतकी आहे. पाणी पातळीत आणखी दोन मीटरने घट झाल्यानंतरच साधारणपणे पुढील महिन्यात ड्रिलिंगचे काम (Drilling Work) जोमाने सुरू होईल. पाणीसाठ्यात घट होऊन, पाणीपातळी उतार होईल. तसे विवरे घेण्याची खोली वाढती राहणार आहे. तीन टप्प्यांत विवरे घेण्याचे काम सुरू राहील, असे ठेकेदार कंपनीच्या सूत्रांनी सांगितले.
धरण मुख्य भिंतीच्या माथ्यापासून पायथ्यापर्यंत ७३ मीटर खोलीत ग्राउंटिंगसाठी विवरे घ्यावी लागणार आहेत. उपायोजना कामाचा कार्यारंभ आदेश ऑक्टोबर २०२४ मध्ये देण्यात आला. मात्र, त्या काळात धरणातील अधिक पाणीसाठा आणि प्रत्यक्ष काम सुरू करण्यापूर्वी तज्ज्ञ समितीकडून पुन्हा गळतीची पाहणी कारणास्तव प्रत्यक्ष काम सुरू होण्यास दोन महिन्यांहून अधिक काळ गेला.
गेल्या आठवड्याभरात धरण पाणी पातळीत जवळपास अर्धा मीटरहून अधिक कमी झाली. त्यामुळे मुख्य भिंतीत बारा मीटर खोलीपर्यंत विंधन विवरे घेण्याचे काम सुरू झाले आहे. मुख्य भिंतीत पहिल्या टप्प्यात सहा मीटर अंतरात विवरे घेण्यात येणार आहेत. विवरे घेण्याचे काम पूर्ण झाल्यानंतरच ग्राउंटिंग कामाला प्रारंभ होईल. अशी माहिती ठेकेदार कंपनीच्या सूत्रांनी दिली. धरण भिंतीस माथ्यावरून निरीक्षण गॅलरीतून फाउंडेशन गॅलरीपर्यंत विंधन विवरे घेऊन ग्राउटिंग होणार आहे.
‘सकाळ’चा पाठपुरावाकळम्मावाडी धरण गळती प्रश्नाबाबत सातत्याने 'सकाळ'ने वस्तुनिष्ठ बातम्या दिल्या आहेत. गळतीचे प्रमाण रोखण्यासाठी शासनाचे लक्ष वेधले. याची दखल घेऊन सध्या हे काम सुरू झाले असून, अखेर ‘सकाळ’च्या प्रयत्नांना यश आले.