छत्रपती संभाजीनगर : थंडीमुळे हिवाळ्यात विजेची मागणी कमी होत असली तरी यंदा शनिवारी (ता. ११) राज्यात २५ हजार ८०८ मेगावॉट इतकी आतापर्यंतच्या विक्रमी विजेची मागणी नोंदविली गेली आहे.
महावितरणने यापूर्वीच नियोजन केल्यानुसार कोणतीही अतिरिक्त वीजखरेदी न करता ही मागणी पूर्ण केल्याची माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महावितरणने वाढत्या वीज मागणीनुसार पुरवठ्याचा आराखडा तयार केला आहे.
त्यामुळे उच्चांकी मागणीनुसार महावितरणला वीजपुरवठा करता आला. महावितरणकडे मुंबईचा काही भाग वगळता संपूर्ण राज्यातील वीज पुरवठ्याची जबाबदारी आहे. महावितरणकडे शनिवारी २५ हजार ८०८ मेगावॉटची वीज मागणी नोंदविली गेली.
हा आतापर्यंतचा उच्चांक आहे. यापूर्वी ता. सात फेब्रुवारी २०२४ रोजी २५,४१० मेगावॉट तर १४ एप्रिल २०२२ रोजी २५,१४४ मेगावॉट अशी उच्चांकी वीज मागणी नोंदविली गेली होती. या मोसमात पाऊस चांगला झाला असल्याने कृषी पंपांसाठी विजेची मागणी वाढल्यामुळे उच्चांकी विजेची मागणी नोंदवली गेल्याचा अधिकाऱ्यांचा अंदाज आहे.
विजेच्या मागणीचा पॅटर्न लक्षात घेऊन महावितरणच्या संबंधित विभागाने यापूर्वीच वीज खरेदी करार केले होते. त्यानुसार शनिवारची उच्चांकी वीज मागणी पूर्ण करण्यात आली.
अशी केली मागणी पूर्णमहानिर्मितीकडून ६,९९६ मेगावॉट, केंद्रीय प्रकल्पांकडून ५,२५२ मेगावॉट तर खासगी प्रकल्पांकडून ५,७३३ मेगावॉट वीज उपलब्ध करण्यात आली. याखेरीज जलविद्युत प्रकल्पांमधून दोन हजार ९ मेगावॉट, सौर उर्जा प्रकल्पांमधून ३,०९३ मेगावॉट, पवन ऊर्जा प्रकल्पांमधून २२८ मेगावॉट आणि सहविद्युतनिर्मिती प्रकल्पांमधून २,४९८ मेगावॉट वीज उपलब्ध झाली. आगामी उन्हाळ्याच्या हंगामात विजेच्या मागणीत संभाव्य वाढ लक्षात घेऊन महावितरणने ग्राहकांना अखंडित वीजपुरवठ्यासाठी नियोजन केले आहे.