मुंबई : शिवसेनेत फूट पडल्यानंतर काहीजण पक्षासोबत राहिले, त्यातील एक म्हणजे कोकणातील बडे नेते, भास्कर जाधव. मात्र, भास्कर जाधव यांनी एका बैठकीत बोलताना पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेनेची जवळ-जवळ काँग्रेस झाली आहे, अशी भूमिका भास्कर जाधव यांनी व्यक्त केली आहे. यावर शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे.
भास्कर जाधवांशी चर्चा करेल, असं संजय राऊत यांनी म्हटलं. तसेच, पक्ष संघर्षाच्या काळातून जाताना आमच्यासारख्या नेत्यांनी जबाबदारीनं आणि संयमानं वागले पाहिजे, असा सल्लाही राऊतांनी भास्कर जाधवांना दिला आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
हेही वाचा : बाळासाहेबांच्या स्मारक समितीवरून उद्धव ठाकरेंना हटविण्याचा शिंदे गटाचा ठराव, संजय राऊत संतापले
संजय राऊत म्हणाले, “भास्कर जाधव काय बोलले हे, तुमच्याकडून कळाले आहे. मात्र, मी भास्कर जाधवांशी चर्चा करेल. आमचे सहकारी आहेत. अनेक वर्षे राजकारणात असून शिवसेनेत आहेत. पण, पक्ष संघर्षाच्या आणि कठीण काळातून जात आहे. अशावेळी आमच्यासारख्या नेत्यांनी जबाबदारीने आणि संयमानं काम केले पाहिजे.”
“प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला पटते, असं नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकांवर मतभेद झाले आहेत. तरीही, बाळासाहेबांनी हा पक्ष ताकदीनं पुढे नेला. आम्ही त्या प्रवासातील साथीदार आहोत,” असं संजय राऊतांनी सांगितलं आहे.
भास्कर जाधवांनी काय म्हटलं?
चिपळूण येथे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची बैठकीत झाली. या बैठकीत भास्कर जाधवांनी पदाधिकाऱ्यांचे कान टोचत पक्षाच्या भूमिकेवर स्पष्ट मत मांडलं होते. यावेळी माजी खासदार विनायक राऊत आणि जिल्हाप्रमुख संजय कदम सुद्धा उपस्थित होते.
“शिवसेनेची जवळ-जवळ काँग्रेस झाली आहे. जे पदाधिकारी काम करत नाहीत, त्यांना बाजूला करायची आमच्यात हिंमत नाही. काम न करणाऱ्याला तो नाराज होऊ नये म्हणून दुसरे पद दिले जाते. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांच्या जुन्या शिवसैनिकांच्या सूचना ऐकल्या जात नाहीत. शाखाप्रमुख, तालुकाप्रमुख आणि जिल्हाप्रमुखांचा कार्यकाळ निश्चित करावा,” असा सल्लाही जाधवांनी विनायक राऊतांना दिला.
हेही वाचा : या महाराष्ट्रात अमित शहांनी XX आणि गांडुळांची पैदास, ठाकरेंच्या शिवसेनेची टीका