नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढच्या तीन-चार महिन्यात महापालिकेच्या निवडणुका लागू शकतात संकेत दिले. या महापालिका निवडणुकांपूर्वी नाशिकमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या आणि राज्य प्रवक्त्या हेमलता पाटील यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या दोन दिवसात त्या पक्षाचा राजीनामा देणार आहेत. विधानसभा निवडणुकीपासूनच हेमलता पाटील नाराज होत्या. अनेक वर्ष पक्षाचे प्रामाणिक काम करून देखील पक्षाकडून अन्याय झाला अशी त्यांची भावना आहे. “पक्ष नेतृत्वाने पूर्णतः दुर्लक्ष केलं. एकमेकांच्या कापाकापीतच पक्षाचे नेते मश्गुल आहेत” असे हेमलता पाटील यांनी काँग्रेस नेत्यांवर गंभीर आरोप केलेत.
कुठल्या पक्षात जायचं, याबाबत दोन दिवसात निर्णय घेणार असल्याच त्यांनी सांगितलं. विधानसभा निवडणुकीत नाशिक मध्यची जागा ठाकरे गटाला दिल्यापासून हेमलता पाटील नाराज होत्या. त्यांनी विधानसभा निवडणुकीच्यावेळी बंडखोरी करुन उमेदवारी अर्ज सुद्धा भरला होता. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी फोनवरुन त्यांच्याशी चर्चा करुन उमेदवारी अर्ज मागे घेण्याची विनंती केली होती. पण त्या आपल्या निर्णयावर ठाम होत्या. अखेर 4 नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी माघार घेतली. पण त्या काँग्रेस पक्षात समाधानी नव्हत्या.
फेसबुक पोस्टमध्ये काय म्हटलं?
काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या आणि प्रवक्ते हेमलता पाटील यांची फेसबुक पोस्ट चर्चेत आहे. या फेसबुक पोस्ट द्वारे मनातील खदखद त्यांनी व्यक्त केली. फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांचे पक्ष सोडण्याचे संकेत मिळाले होते. भावी राजकीय वाटचालीसाठी तुमच्या आशीर्वादाची अपेक्षा असे पोस्टमध्ये म्हटले होते. “जेंव्हा तुमची निष्ठा तुमचा प्रामाणिक पणा ही तुमची कमजोरी समजली जाते. तुम्ही ज्याला आपुलकीचा बंध समजता त्याच बंधाचा वापर तुमच्या भोवती आवळण्याचा फास म्हणून होतो तेंव्हा हा बंध झुगारणे हाच एकमेव मार्ग आहे अशा विचारा प्रती मी आता पोहचलेय. तुम्ही माझ्या विचारांशी सहमत आहात का? अपेक्षा आहे भावी वाटलाची साठी आपल्या अशिर्वादाची” असं त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिलय.