महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काँग्रेसमध्ये राज्य स्तरावर संघटनात्मक फेरबदल होतील अशी मागच्या काही दिवसांपासून चर्चा आहे. काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलला जाणार, असं राजकीय वर्तुळात बोललं जातय. अजून काँग्रेस हायकमांडने तशी पावलं उचलेली नाहीत. पण नाना पटोले यांचं प्रदेशाध्यक्षपद धोक्यात आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत खदखद दिसून येतेय. काही नेते अप्रत्यक्षपणे नाना पटोले यांना जबाबदार ठरवत आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने अत्यंत खराब कामगिरी केली आहे. महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतरची काँग्रेस पक्षाची ही सुमार कामगिरी आहे. काँग्रेसचे फक्त 16 आमदार निवडून आलेत.
काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्षपदासाठी माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव चर्चेत आहे. आता पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून प्रतिक्रिया आली आहे. “प्रदेशाध्यक्ष पदासाठी मी इच्छुक नाही. जी चर्चा सुरू आहे, ती मला माहित नाही असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलय. “आज नव्या काँग्रेस कार्यालयाचे उद्घाटन होत आहे त्याचा आनंद आहे. अकबर रोडवरील कार्यालयाला मोठा इतिहास आहे” असं ते म्हणाले. दुसऱ्याबाजूला माजी आमदार यशोमती ठाकूर यांनी प्रदेशाध्यक्ष पदासाठी इच्छुक असल्याचे संकेत दिलेत. “महिलांना संधी मिळाली तर चांगलंच आहे. पक्ष कोणाला संधी देतो बघू” असं त्या म्हणाल्या.
‘जोमाने आम्ही काम करणार’
“जुन्या कार्यालया सोबत अनेक आठवणी. मात्र नव्या कार्यालयात सर्वधर्म समभाव राखला जाईल. जोमाने आम्ही काम करणार आहोत” असं यशोमती ठाकूर काँग्रेस पक्षाच्या नव्या कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी म्हणाल्या. राज्यातून सतेज ऊर्फ बंटी पाटील, खासदार शाहू छत्रपती, यशोमती ठाकूर नव्या काँग्रेस पक्ष कार्यालच्या उद्घटनासाठी गेले आहेत.