मकर संक्रांतीनिमित्त सासू रेणुका (ता. १३) जावयाच्या घरी मुलगीला तीळगूळ आणि भोगी देण्यासाठी गेल्या होत्या. या ठिकाणी पैसे आणि मुलीच्या तब्येतीवरून वाद झाला.
बेळगाव : कौटुंबिक वादातून (Family Dispute) जावयाने केलेल्या चाकू हल्ल्यात सासूचा मृत्यू झाल्याची घटना (ता. १३) घडली. या प्रकरणात जावयासह त्याच्या आई-वडील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम दत्ता बिर्जे (वय २०, रा. मारुती गल्ली, खासबाग, सध्या रा. रयत गल्ली, वडगाव, बेळगाव), दत्ता मल्लाप्पा बिर्जे (५०), सुजाता दत्ता बिर्जे (४४, दोघे रा. मारुती गल्ली, खासबाग, बेळगाव) अशी दाखल झालेल्यांची नावे आहेत.
तर, चाकू हल्ल्यात रेणुका श्रीधर पाडमुखे (४३, रा. कल्याणनगर, वडगाव, बेळगाव) यांचा मृत्यू झाला आहे. याबाबत माहिती अशी की, संशयित आरोपी शुभम बिर्जे याचा सात महिन्यांपूर्वी मृत रेणुकाची मुलगी छाया हिच्याशी विवाह (Marriage) झाला. मात्र, छाया काही दिवसांपासून आजारी होती. सासरचे लोक तिला व्यवस्थित उपचार उपलब्ध करून देत नव्हते.
या कारणांनी सासू आणि जावई यांच्यात शाब्दिक चकमक व वाद व्हायचे. यातून (ता. १३) पावणेबाराच्या सुमारास वडगाव रयत गल्लीत विषयावर सासू व जावई यांच्यात जोरदार वाद झाला. मुलीची काळजी घेण्यावरून सासू रेणुका आणि जावई यांच्यात भांडण झाले. या दरम्यान जावयाकडून सासूवर चाकूहल्ला झाला. यामध्ये रेणुका गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी दाखल केले. उपचाराला प्रतिसाद दिला नाही. या प्रकरणात फिर्याद दाखल करून घेण्यात आली. याआधारे तिघांविरोधात गुन्हा दाखल केला. शहापूर पोलिस ठाण्यात याची नोंद आहे.
आरोपीच्या आई-वडिलांवरही गुन्हामकर संक्रांतीनिमित्त सासू रेणुका (ता. १३) जावयाच्या घरी मुलगीला तीळगूळ आणि भोगी देण्यासाठी गेल्या होत्या. या ठिकाणी पैसे आणि मुलीच्या तब्येतीवरून वाद झाला. यादरम्यान शुभमने सासूवर चाकूहल्ला केला. तेथे शुभमचे वडील दत्ता व आई सुजाता होत्या. त्यांनी भांडण सोडविण्याची गरज होती. मात्र, उलट त्यांनी मुलाला हल्ल्यासाठी प्रवृत्त केले. त्यासाठी शुभमसोबत त्याच्या आई-वडिलांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे, असे पोलिसांनी सांगितले.