Mhada Lottery : 'म्हाडा'च्या एका घरासाठी १९ जणांचे अर्ज: तीन हजार ६६२ घरांसाठी ७१ हजार ६४२ अर्ज; २८ जानेवारीला लॉटरी
esakal January 15, 2025 03:45 PM

सोलापूर : सामान्य लोकांसह पत्रकार, एससी, एससी, व्हीजेएनटी, कलाकार, दिव्यांग, सरकारी नोकरदार (केंद्र व राज्य शासनाचे), म्हाडाचे कर्मचारी, माजी सैनिक अशा विविध घटकांसाठी ‘म्हाडा’च्या माध्यमातून २० टक्के योजनेतून माफक दरात घरे मिळतात.

पुणे ‘म्हाडा’ने ऑक्टोबरमध्ये प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार पुणे महानगर क्षेत्रातील तीन हजार ६६२ घरांसाठी राज्यभरातून तब्बल ९३ हजार ६६२ जणांनी अर्ज केले आहेत. त्यातील ७१ हजार ६४२ जणांनी अर्जासोबत शुल्क भरले आहे. आता अर्जदारांची प्रारुप यादी प्रसिद्ध झाली असून २८ जानेवारीला लॉटरी काढली जाणार आहे.

देशातील राहण्यायोग्य शहरांमध्ये पुणे शहर पहिल्या पाच क्रमांकात आहे. पुण्याचा विस्तार होत असतानाच जागा किंवा घरांच्या किंमती गगनाला भिडल्याचे चित्र आहे. मुंबईतही ‘म्हाडा’च्या २० टक्के योजनेतील घरांसाठी अर्जांची संख्या मोठी असते. पुण्यातही ऑक्टोबर २०२४ मध्ये निघालेल्या ‘म्हाडा’च्या २० टक्के योजनेतील अर्जासाठी दोनवेळा मुदतवाढ मिळाली आणि तीन हजार ६६२ घरांसाठी पाऊणलाख अर्ज प्राप्त झाले. दरवर्षी ‘म्हाडा’अंतर्गत २० टक्के योजनेतील घरे मिळावीत म्हणून हजारो लोक प्रतीक्षा करीत असतात. सर्व प्रक्रिया ऑनलाइन असल्याने त्यात मानवी हस्तक्षेप नसून लाभाभार्थी निवडीची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक असते. त्यातून हजारो सामान्य कुटुंबासह विविध घटकातील लाभार्थींना माफक दरात हक्काचा निवारा मिळाला आहे.

मार्चमध्ये ‘म्हाडा’ची नवी जाहिरात

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाकडून (म्हाडा) दरवर्षी सामान्यांसाठी २० टक्के योजनेच्या घरांची जाहिरात प्रसिद्ध केली जाते. ऑक्टोबरमध्ये जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर या अर्जदारांची लॉटरी जानेवारीअखेर प्रसिद्ध होईल. त्यानंतर मार्च महिन्यात ‘म्हाडा’तर्फे २० टक्के योजनेची जाहिरात निघू शकते, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

म्हाडा’अंतर्गत २० टक्के योजनेतील घरे घेण्यासाठी

राज्यभरातून पुण्यातील घरांसाठी अर्ज प्राप्त झाले आहेत. पुण्यात घर घेण्याचे त्यांचे स्वप्न असते आणि ते पूर्ण करण्यासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणावर अर्ज येतात. २० टक्के योजनेतून सामान्यांसह विविध घटकातील लाभार्थींना माफक दरात घर मिळते.

- राहुल साकोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी, म्हाडा, पुणे

म्हाडा’च्या पुण्यातील घरांसाठी अर्ज एकूण घरे
  • ३,६६२

  • एकूण अर्जदार

  • ९३,६६२

  • शुल्क भरलेले अर्जदार

  • ७१,६४२

  • एका घरासाठी सरासरी अर्ज

  • १९

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.