महाकुंभ नगरी : मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर कुंभमेळ्यात सहभागी झालेल्या विविध आखाड्याच्या साधूंनी मंगळवारी पहिले ‘अमृत स्नान’ केले. गंगा, यमुना आणि सरस्वतीच्या प्रयागराज येथील त्रिवेणी संगमावर लाखो भाविकांनीही ‘अमृतस्नान’ केले.
श्रीपंचायती महानिर्वाणी आखाडा आणि श्रीशंभू पंचायती अटल आखाड्याच्या साधूंनी त्रिवेणी संगमावर सर्वांत आधी अमृतस्नान केले. यावेळी साधूंनी केलेल्या हरहर महादेव, जय श्रीराम आणि जय गंगा मैय्या या जयघोषांनी संगमावरील आसमंत दुमदुमून गेला होता. यावेळी साधूंवर आणि भाविकांवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली.
दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अमृत स्नानामिमित्त आणि मकरसंक्रांती निमित्त सर्व आखाड्याच्या साधूंना आणि भाविकांना वंदन केले. सोमवारी पुष्य पौर्णिमेनिमित्त दीड कोटीहून अधिक भाविकांनी त्रिवेणी संगमावर स्नान केल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
परदेशी भाविकांचेही स्नानकुंभमेळ्यात सहभागी झालेल्या लॉरेन पॉवेल जॉब्ज यांनी मंगळवारी त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केले. लॉरेन या निरंजनी आखाड्याचे महामंडलेश्वर गुरू स्वामी कैलाशानंद गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली कुंभमेळ्यात सहभागी झाल्या आहेत. लॉरेन यांनी विशेष प्रकारची ॲलर्जी असल्याने आणि त्या याआधी एवढ्या गर्दीत कधी सहभागी झाल्या नसल्याने पवित्र स्नानानंतर विश्रांती घेत असल्याचे सांगण्यात आले. लाॅरेन या अॅपलचे संस्थापक स्टीव्ह जाॅब्ज यांची पत्नी आहेत. गर्दीमुळे त्यांना काही काळ अस्वस्थ वाटू लागले होते असे सांगण्यात येत आहे.
यंदा कुंभमेळ्यात सहभागी झालेल्या परदेशी नागरिकांची संख्या लक्षणीय आहे. तुर्कियेच्या पिनारा यादेखील परदेशी भाविकांपैकी एक असून त्या भारतीय संस्कृती समजावून घेण्यासाठी भारतात दाखल झाल्या आहेत. पिनारा यांनी मंगळवारी शाही स्नान केले. त्याचप्रमाणे त्या येथील साधूंकडून भारतीय संस्कृतीबद्दल जाणून घेत आहेत. कुंभमेळ्याबद्दल मित्रमैत्रिणींकडून ऐकल्याबद्दल कुतूहल निर्माण झाल्यामुळे कुंभमेळ्यात सहभागी झाले, असे पिनारा सांगतात.
‘कुंभ साहाय्यक’ ठरणार भाविकांचा डिजिटल मार्गदर्शकइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या वतीने कुंभमेळ्यानिमित्त ‘कुंभ साहाय्यक’ हा एआय आधारित चॅटबॉट तयार करण्यात आला आहे. या चॅटबॉटमधील भाषिणी या बहुभाषिक साहाय्यक प्रणालीच्या माध्यमातून भाविकांना त्यांच्या प्रादेशिक भाषांमधून प्रशासनाशी संपर्क साधता येणार आहे.
या चॅटबॉटमधील ‘डिजिटल खोया-पाया’ प्रणालीच्या माध्यमातून कुंभमेळ्यात हरवलेल्या व्यक्तींना त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचता येणार आहे. विशेष म्हणजे या चॅटबॉटमध्ये प्रादेशिक भाषांमध्ये व्हॉइस टायपिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कुंभमेळ्यामध्ये कोणकोणत्या दिवशी कोणकोणते कोणते कार्यक्रम होणार आहेत; महाकुंभ नगरीमध्ये तसेच प्रयागराजमध्ये कोणकोणती स्थळे पाहता येतील याबाबतची माहिती आणि सार्वजनिक सुविधांची माहिती या चॅटबॉटच्या माध्यमातून मिळणार आहे. हे चॅटबॉट म्हणजे एकप्रकारे कुंभमेळ्याची आॅनलाईन मार्गदर्शक पुस्तिका असल्याचे मत अनेक वापरकर्त्यांनी व्यक्त केले आहे. या चॅटबॉटचा उपयोग देशविदेशातील पर्यटकांनाही होणार आहे.
वार्तालापभाषिणी प्रणालीमधील भाषांतराच्या क्षमतेमुळे विविध भाषिक भाविकांना त्यांच्या भाषेतून उत्तर प्रदेश पोलिसांशी थेट संपर्क साधता येणार आहे. यासाठी वार्तालाप किंवा कॉनव्हर्स हा पर्याय देण्यात आला आहे.
चॅटबॉटमधील सुविधा
महाकुंभ २०२५ बद्दल विस्तृत माहिती
कुंभमेळ्यात होणाऱ्या विविध स्नानांच्या तारखांची आणि अन्य पर्वणीची माहिती
प्रशासनाच्या वतीने महाकुंभ नगरीमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या सार्वजनिक सुविधांची माहिती
यात्रा आणि पॅकेजेस या पर्यायाच्या माध्यमातून खाद्यपदार्थ, वैद्यकीय सेवा, निवास व्यवस्था यासंबंधीची माहिती
प्रवास आणि मुक्काम या पर्यायाच्या माध्यमातून प्रयागराज येथे प्रवासाबाबत सर्व माहिती
या भाषांमध्ये सुविधा उपलब्ध
मराठी, हिंदी, इंग्रजी, तमीळ, पंजाबी, तेलुगू, गुजराती,कन्नड, उर्दू, बंगाली, मल्याळम