लोणंद : लोणंद नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सीमा वैभव खरात यांनी आज ऐन संक्रांतीच्या सणादिवशीच नगराध्यक्षपदाचा राजीनामा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याकडे दिला, तर उपनगराध्यक्ष रवींद्र क्षीरसागर यांनीही आज आपल्या पदाचा राजीनामा नगराध्यक्षा सीमा खरात यांच्याकडे दिल्याने लोणंद नगरपंचायतीचे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पद रिक्त झाले आहे. दरम्यान सत्ताधारी राष्ट्रवादी कॉँग्रेस अंतर्गत खांदेपालट होत असताना नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदी आता कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
लोणंद नगरपंचायतीचे नगराध्यक्षपद पहिल्या अडीच वर्षांसाठी अनुसूचित जाती सर्वसाधारण जागेसाठी राखीव झाल्यानंतर आमदार मकरंद पाटील यांनी सुरुवातीला प्रभाग सातमधून विजयी झालेल्या मधुमती गालिंदे-पलंगे यांना नगराध्यक्षपदाची, तर प्रभाग नऊमधून विजयी झालेले शिवाजीराव शेळके- पाटील यांना उपाध्यक्षपदाची संधी दिली होती. त्याच वेळी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गत सव्वा सव्वा वर्षाच्या फॉर्म्युल्याचा ठराव करण्यात आला होता.
त्या ठरावानुसार नगराध्यक्षा सीमा खरात यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे, तर उपनगराध्यक्ष रवींद्र क्षीरसागर यांनी नगराध्यक्षा सीमा खरात यांच्याकडे आज आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्या वेळी माजी उपनगराध्यक्ष रवींद्र क्षीरसागर व शिवाजीराव शेळके- पाटील, नगरसेवक सचिन शेळके, गणिभाई कच्छी, सागर शेळके, भरत बोडरे, तसेच अॅड. गणेश शेळके, ॲड. गजेंद्र मुसळे, सागर गालिंदे, असगरभाई इनामदार आदी उपस्थित होते.
लोणंद नगरपंचायतीच्या १७ पैकी १० जागा जिंकून राष्ट्रवादी कॉँग्रेसने बहुमत मिळवत सत्ता काबीज केली, तर काँग्रेस व भाजपला प्रत्येकी तीन तर एका जागेवर अपक्ष विजयी झाले होते. सुरुवातीला राष्ट्रवादीच्या मधुमती गालिंदे, शिवाजीराव शेळके- पाटील यांना, त्यानंतर सीमा खरात व रवींद्र क्षीरसागर यांना संधी मिळाली होती. मात्र, नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान बरीच राजकीय समीकरणे बदलली आहेत.
काँग्रेसच्या दीपाली नीलेश शेळके व प्रवीण व्हावळ यांनीही महाविकास आघाडीला तिलांजली देत महायुतीचे काम पसंत केले, तर भाजपच्या दीपाली संदीप शेळके, तृप्ती घाडगे व ज्योती डोणीकर यांनी जागेवरच ठाम राहून महायुतीचा धर्म पाळत पक्षादेशानुसार आमदार मकरंद पाटील यांचेच काम केले, तसेच अपक्ष नगरसेविका राजश्री शेळके यांनीही आमदार पाटील यांचेच काम केल्याने काँग्रेसच्या आसिया बागवान या एकमेव एक नगरसेविका विरोधी बाकावर राहिल्या आहेत.
मंत्री मकरंद पाटलांचा कौल महत्त्वाचानगराध्यक्षपद हे अनुसूचित जाती जागेसाठीच पुन्हा आरक्षित झाल्याने राष्ट्रवादीच्या मधुमती गालिंदे यांना दुसऱ्यांदा, तर काँग्रेसच्या दीपाली नीलेश शेळके यांना प्रथम नगराध्यक्षपदाची संधी निर्माण झाली आहे. मात्र, मंत्री मकरंद पाटील हे कोणती राजकीय समीकरणे जुळवत कोणाला संधी देणार हे मात्र आजतरी गुलदस्त्यात आहे.