शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी जिल्हा परिषदेचे 'विनोबा' ॲप! शिक्षकांचे प्रश्न वेळेत सुटणार; उत्कृष्ट अध्यापन कृतीला मिळणार बक्षीस, ॲपचे असे आहेत फायदे...
esakal January 15, 2025 03:45 PM

सोलापूर : जिल्हा परिषदेने पुण्यातील ओपन लिंक्स फाउंडेशनच्या मदतीने ‘विनोबा’ हे खास मोबाईल ॲप विकसित केले आहे. या ॲपच्या माध्यमातून आचार्य विनोबा भावे शिक्षक सहाय्य कार्यक्रम राबविण्यात येत आहे. अध्यापन पद्धतीत होणारे बदल प्रत्येक शिक्षकाला घरबसल्या कळावेत, जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक तंत्रस्नेही बनावेत, हा या मागचा उद्देश आहे. तसेच या ॲपमुळे शिक्षकांचे प्रश्नही वेळेत सुटणार आहेत.

विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढ आणि शिक्षकांच्या अध्यापन पद्धतीत सुधारणा व्हावी, यासाठी साकारलेल्या या प्लॅटफॉर्मची सोमवारी तंत्रस्नेही शिक्षकांच्या कार्यशाळेत सुरवात करण्यात आली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, निवृत्त सनदी अधिकारी मल्लिनाथ कलशेट्टी, प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख, ओपन लिंक्स फाउंडेशनचे डॉ. संजय दालमिया यांची प्रमुख उपस्थिती होती. यासाठी प्रत्येक तालुक्यातून पाच शिक्षक, एक केंद्रप्रमुख, एक विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी अशाप्रकारे ८८ जण उपस्थित होते. या प्लॅटफॉर्मवर सर्व प्राथमिक शिक्षकांना आता एका क्लिकवर एकमेकांशी अध्यापनविषयक ऑनलाइन संवाद साधणे, नवे अध्यापन कौशल्य विकसित करणे, अध्यापन पद्धतीत सुधारणा करणे, विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठीच्या साहित्याबाबत चर्चा करता येणार आहे. त्यासोबतच अध्यापन व अध्यापन साहित्यविषयक व कार्यक्रमाचा व्हिडओ त्यावर अपलोड करता येणार आहे. त्यामुळे राज्यासह परराज्यातील शिक्षकांनाही त्याविषयी माहिती मिळणार आहे. शैक्षणिक अध्यापन व गुणवत्ता सुधारण्यास मदत होणार आहे.

उत्कृष्ट अध्यापन कृतीला मिळणार बक्षीस

दरमहा अध्यापनविषयक साहित्यांचे आदान - प्रदान करणाऱ्या शिक्षकांना बक्षीस दिले जाणार आहे. त्यासाठी त्यांच्या उत्कृष्ट व्हिडिओची निवड केली जाणार आहे. त्याशिवाय ओपन लिंक्स फाउंडेशन शिष्यवृत्ती परीक्षेसह गुणवत्ता विषयक कामाच्या विश्लेषणासाठी शिक्षण विभागाला मदत करणार आहे. जेणेकरून शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी हे ॲप सहाय्यभूत ठरणार आहे. तसेच प्रशिक्षण प्राप्त ८८ शिक्षक व अधिकारी तालुकास्तरीय कार्यशाळा घेऊन इतर शिक्षकांना प्रशिक्षण देणार आहेत.

शिक्षकांचे प्रश्नही वेळेत सुटणार

या प्लॅटफॉर्मवर शिक्षकांविषयीच्या सेवाही उपलब्ध आहेत. शिक्षकांच्या वैद्यकीय बिले, निवृत्ती वेतन आदी प्रस्तावही वेळेत निकाली निघणार आहे. त्यांनी सादर केलेल्या सेवा संचिकांची स्थिती मुख्य कार्यकारी अधिकारी व प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना डॅशबोर्डवर पाहता येणार आहे. त्यामुळे त्यांचे प्रश्नही वेळेत सुटणार असल्याने त्यांना त्यासाठी कार्यालयात हेलपाटे मारावे लागणार नाही.

ॲपचे असे आहेत फायदे...

  • दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी उपयुक्त

  • प्राथमिक शिक्षकांना अध्यापन पद्धतीत सुधारणा करण्यासाठी लाभदायी

  • जिल्हा परिषदेचला जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्तेवर देखरेख व नियंत्रण ठेवता येणार

  • जिल्ह्यातील विविध शाळांमधील अनेकविध उपक्रमांची देवाणघेवाण करणे होणार सोपे

  • शिक्षकांचे प्रस्ताव वेळेत मार्गी लागणार

हे प्लॅटफॉर्म शिक्षकांसाठी सहाय्यभूत ठरणार

आचार्य विनोभा भावे शिक्षक सहाय्यक कार्यक्रमांतर्गत शिक्षकांना विनोबा ॲप उपलब्ध करून दिले आहे. अध्यापन विषयक साहित्यांच्या आदान-प्रदानामुळे शैक्षणिक गुणवत्ता वाढीस मदत होणार आहे. त्याशिवाय शिक्षकांचे विविध प्रश्नही वेळेत सुटणार आहेत. एकूणच हे प्लॅटफॉर्म शिक्षकांसाठी सहाय्यभूत ठरणार आहे.

- कादर शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.