Sharad Pawar: मतदारांनी शरद पवारांना हद्दपार केले; आशीष शेलारांचा दावा
esakal January 15, 2025 03:45 PM

Mumbai: शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका करताना आपला तोल गमावला आहे.

विश्वासघाताचे आणि खंजीर खुपसण्याचे राजकारण आजवर केल्यामुळेच महाराष्ट्राच्या मतदारांनी शरद पवार यांना हद्दपार केल्याची टीका मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री आशीष शेलार यांनी मंगळवारी (ता. १४) केली. भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत शेलार बोलत होते. या वेळी प्रदेश भाजप समन्वयक विश्वास पाठक आणि भाजपचे प्रदेश माध्यम विभागप्रमुख नवनाथ बन उपस्थित होते.

शेलार म्हणाले की, शरद पवार यांनी ‘पुलोद’च्या निर्मितीबाबत बोलताना आपण जनसंघाच्या बळावर मुख्यमंत्री झालो हे मान्य केले. मात्र हे सरकार बनवण्याआधी विश्वासघाताचे आणि खंजीर खुपसण्याचे कोणते विचारमंथन तुम्ही केले होते, कोणाच्या विरोधात केले होते, हे सत्यही महाराष्ट्राच्या जनतेपुढे येऊ द्या.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना न्यायालयीन प्रक्रियेद्वारे निर्दोषत्व मिळाले आहे. मात्र न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करून अमित शाह यांच्यावर तुम्ही टीका करणार असाल तर ‘लवासा’पासून अनेक प्रकरणांमध्ये न्यायालयाने कोणाकडे बोट दाखवले आहे, हे बोलण्याची वेळ येऊ देऊ नका, असेही शेलार म्हणाले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.