Online Hall Ticket : बारावी परीक्षेचे हॉल तिकीट होणार ऑनलाइन उपलब्ध
esakal January 15, 2025 03:45 PM

नांदेड : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक मंडळ, पुणे यांच्याशी संलग्न असलेल्या सर्व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक प्राचार्य यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेचे हॉल तिकीट ऑनलाइन उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश मंडळाने दिले आहे.

शाळेत हॉल तिकीट डाऊनलोड करून त्यावर शाळेचा शिक्का उमटवून स्वाक्षरी देण्यात यावी, अशी सूचना करण्यात आली आहे. हॉल तिकीट अर्थात प्रवेशपत्र उपलब्ध करून देताना विद्यार्थ्यांकडून कोणतीही वेगळे शुल्क घेऊ नये.

सदर प्रवेश पत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापक प्राचार्य यांचा शिक्का उमटून स्वाक्षरी करावी, अशी सूचना करण्यात आली आहे. हॉल तिकीट संदर्भातील सर्व सूचना मुख्याध्यापक प्राचार्य यांना करण्यात आल्या आहेत.

यासंदर्भात कोणतीही अडचण असल्यास शाळेतून दूर करण्याबाबत मंडळांनी स्पष्ट केले आहे. हॉल तिकीटमध्ये काही दुरुस्ती हवी असल्यास तीदेखील करण्याची व्यवस्था ऑनलाइन पद्धतीने करण्यात आली आहे. ऐनवेळी प्रवेशपत्र गहाळ झाल्यास डुप्लिकेट प्रवेशपत्र विद्यार्थ्यांना उपलब्ध करता येणार आहे.

शुक्रवारी (ता.१०) प्रवेशपत्र लिंकद्वारे डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध करण्यात आले आहे. मोठ्या महानगरांमध्ये विद्यार्थ्यांनी पालकांनी परीक्षेच्या एक दिवस आधीच आपल्या सेंटरची माहिती करून घ्यावी. त्यामुळे दुसऱ्या दिवशी धावपळ होणार नाही. तसेच परीक्षेच्या दिवशी घरून निघणे ते सेंटर पोहोचणे याचे योग्य नियोजन करावे. किमान तासभर आधी सेंटरवर पोहोचण्याचे नियोजन करणे आवश्यक असल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.