बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या गुन्ह्यात वाल्मीक कराडला आरोपी करून त्याच्यावर मकोकानुसार कारवाई करण्यात आली आहे. यानंतर करडा समर्थक आक्रमक झाले असून त्यांनी मंगळवारपासून परळीत आंदोलन सुरू केलं आहे. तसेच आज परळी बंदचीही हाक देण्यात आली आहे. तसेच कराड समर्थक टॉवरवर चढले असून त्याची पत्नी आणि आईने मकोका मागे घेण्यासाठी आंदोलन सुरू केले आहे. परळीमध्ये जाळपोळ करण्यात आली आहे. वाल्मीक कराडवर गंभीर आरोप असतानाही त्याच्यावरील गुन्हे मागे घेण्यासाठी आंदोलन होणे हे गृहमंत्रालयाचे अपयश असल्याची टीका करत सुप्रिया सुळे यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. दरम्यान, परळीत बिघडलेल्या परिस्थितीवर आता पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी गृहमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे म्हटले आहे. (Pankaja Munde to discuss with Devendra Fadnavis on deteriorating law and order situation in Parli)
वाल्मीक कराडवर मंगळवारी मकोकाअंतर्गत कारवाई करण्यात आल्यानंतर परळी शहरात तीव्र पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत. परळीतील चार जणांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला असून दोन ठिकाणी कराड समर्थकांकडून टायर जाळून सरकारच्या कारवाईचा निषेध नोंदविला आहे. यानंतर आज सकाळी वाल्मीक कराडच्या पांगरी गावातील पांगरी कॅम्प येथे असलेल्या भारतीय दूरसंचार निगम लिमिटेडच्या टॉवरवर चढून समर्थकांनी वाल्मीक कराडला न्याय देण्यासाठी घोषणाबाजी केली. यानंतर पांगरी आणि पांगरी कॅम्प येथील ग्रामस्थांनीही रस्त्यावर उतरून घोषणाबाजी केली. त्यामुळे वाल्मीक कराडला केज ऐवजी बीज न्यायालयात आज हजर करण्यात आले.
न्यायालयाने सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मीक कराडला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर कराड समर्थकांनी आणि त्याच्या विरोधकांनी न्यायालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी वकील हेमा पिंपळे यांनी संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. कारवाईच्या प्रत्येक गोष्टीत पारदर्शकता पाहिजे. आमच्यासोबत महिला आहेत. बीड जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राहिलेली नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस तुम्ही बीड जिल्ह्यात या आणि कायदा-सुव्यवस्था सुधारा, असे त्यांनी म्हटले. मात्र माध्यमांशी संवाद साधत असतानाच हेमा पिंपळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी पोलीस आणि त्यांच्यात झटापट झाल्याचे पाहायला मिळाले.
हेही वाचा – हत्येच्या दिवशी वाल्मीक कराडची संतोष देशमुखांना धमकी; न्यायालयात वकिलांचा दावा
न्यायालयाच्या निर्णयानंतर कराड समर्थकांनीही न्यायालयाबाहेर निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली. वकील राहुल आडाव यांनी म्हटले की, वाल्मिक कराडवरील खोटे गुन्हे मागे घ्या. तुम्ही कशाप्रकारे कायदा-सुव्यवस्था राखतात हे आम्हाला माहीत आहे. संतोष देशमुखांना 100 टक्के न्याय मिळाला पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे. परंतू अशी स्टंटबाजी करत असाल तर आम्ही सहन करणार नाही. शेवटी कायद्याच्या पलिकडे आम्ही माणूस आहोत. माणसातला माणूस म्हणून आम्ही वाल्मीक कराड यांच्याकडे पाहत आहोत. त्यामुळे वाल्मीक कराड यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घ्या, असे म्हणत वकील राहुल आडाव यांच्यासह कराड समर्थकांनी न्यायालयाबाहेर घोषणाबाजी केली. परळीत बिघडलेल्या परिस्थितीवर पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान, परळीमध्ये कायदा आणि सुव्यावस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. असा प्रश्न विचारला असता पंकजा मुंडे म्हणाल्या की, यावर मी गृहमंत्र्यांशी चर्चा करेल आणि तेथील तणाव कमी करण्यासाठी काही करता येतं का? हे पाहिलं. याचवेळी त्यांना विचारण्यात आले की, पंतप्रधान आज मुंबईत होते. सर्व आमदार त्यांच्यासोबत होते. यावेळी त्यांनी मंत्र्यांना काही कानमंत्र दिलं का? या प्रश्नावर पंकजा मुंडे म्हणाल्या की, काहीही कानमंत्र दिलेला नाही. आमची छान बैठक झाली, असे उत्तर दिले.
हेही वाचा – Walmik Karad : कराडला आणखी एक धक्का; केजमधील वाईन शॉपचं ना हरकत प्रमाणपत्र रद्द