इस्रायल आणि हमास यांच्यात युद्धबंदी आणि ओलिसांच्या सुटकेबाबत करार; नेमकी कशावर सहमती?
BBC Marathi January 16, 2025 12:45 PM
Getty Images या करारानंतर इस्रायली लोकांनी आनंद साजरा केला.

इस्रायल आणि हमास यांच्यात युद्धबंदी आणि ओलिसांच्या सुटकेच्या करारावर सहमती झाली आहे.

इस्रायल आणि हमास यांच्यातील हा करार कतारमध्ये अंतिम झाला आहे.

युद्धविराम कराराशी संबंधित माहिती असलेल्या एका सूत्रानं बीबीसीला ही माहिती दिली आहे.

हमासच्या एका अधिकाऱ्यानं बीबीसीला सांगितलं की, कतार आणि इजिप्तच्या मध्यस्थांना हमासनं युद्धविराम कराराला मान्यता दिल्याची माहिती दिली आहे.

7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासनं इस्रायलवर हल्ला केला होता ज्यात 1 हजार 200 इस्रायली नागरिक मारले गेले होते. तर 251 जणांना ओलीस म्हणून गाझात नेलं.

त्यानंतर इस्रायलनं गाझावर हल्ला चढवला. गेले 15 महिने चाललेल्या युद्धादरम्यान गाझामध्ये 46 हजार 700 नागरिकांचा मृत्यू झाल्याची हमास प्रशासित गाझातील आरोग्य मंत्रालयाची आकडेवारी सांगते.

इस्रायलचे म्हणणं आहे की, 94 ओलिस अजूनही हमासच्या ताब्यात आहेत, त्यापैकी 34 मृत समजले जात आहेत. याव्यतिरिक्त, युद्धापूर्वी अपहरण केलेले चार इस्रायली आहेत, त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे.

या संघर्षादरम्यान, 23 लाख नागरिक विस्थापित झाले आहेत. गाझामध्ये भयंकर विनाश पाहायला मिळाला. इथल्या संघर्षामुळं अन्न, इंधन, औषध आणि निवारा यांची तीव्र टंचाई निर्माण झाली.

अमेरिकेकडून स्वागत

अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी एका म्हटलंय, अमेरिकेच्या अनेक महिन्यांच्या परिश्रमानंतर इजिप्त आणि कतारच्या सहकार्यानं इस्रायल आणि हमास या करारापर्यंत पोहचले आहेत.

"आम्ही या बातमीचे स्वागत करत असताना त्या सर्व कुटुंबांची आठवण करतो ज्यांचे नातेवाईक हमासच्या 7 ऑक्टोबरच्या हल्ल्यात मारले गेले आणि त्यानंतर झालेल्या युद्धात अनेक निष्पाप लोक मारले गेले," असं निवेदनात म्हटलं आहे.

Getty Images गाझातील पॅलेस्टिनी नागरिकांनी करारानंतर आनंद साजरा केला.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या कार्यालयानंही एक निवेदन जारी केलं आहे. यात ओलिसांच्या सुटकेसाठी आणि इस्रायलला ओलिसांचे आणि त्यांच्या कुटुंबांचे दुःख दूर करण्यासाठी मदत केल्याबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानले आहेत.

या कराराचा तपशील अंतिम झाल्यानंतर बेंजामिन नेतन्याहू अधिकृतपणे त्याची घोषणा करतील, असं इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयानं म्हटलं आहे.

Reuters बेंजामिन नेतन्याहू

नेतान्याहू यांनी आधी फोन कॉल करत अमेरिकेचे भावी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि मावळते अध्यक्ष जो बायडन यांना करार करण्यात मदत केल्याबद्दल आभार मानले.

'शांतता हे सर्वोत्तम औषध आहे'

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस घेब्रेयेसुस यांनी एक्सवर युद्धविराम कराराविषयी आनंद व्यक्त केला. तसेच शांतता हे सर्वोत्तम औषध असल्याचं नमूद केलं.

ते म्हणाले, "गाझा युद्धविराम आणि बंधकांच्या सुटकेचा करार स्वागतार्ह आणि उत्साहवर्धक आहे. खूप जीव गमावले आहेत आणि अनेक कुटुंबांना त्रास सहन करावा लागला आहे. आम्हाला आशा आहे की, सर्व पक्ष या कराराचा आदर करतील आणि चिरस्थायी शांततेसाठी कार्य करतील."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.