Pangri Camp Protest : पांगरी कॅम्प येथे दुसऱ्या दिवशीही रास्ता रोको
esakal January 16, 2025 03:45 PM

परळी वैजनाथ : वाल्मीक कराड याला मंगळवारी ‘मकोका’ लावण्यात आला. कराड याच्या समर्थनार्थ मंगळवारी दिवसभर समर्थकांनी आक्रमक आंदोलने केली.

बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी वाल्मीक कराडचे गाव असलेल्या पांगरी कॅम्प येथे रास्ता रोको करण्यात आला. यादरम्यान काही कार्यकर्त्यांनी मोबाइल टॉवरवर चढून जोरदार घोषणाबाजी केली.

वाल्मीक कराडच्या पांगरी कॅम्प गावात बुधवारी सकाळी येथील बीएसएनएलच्या मोबाइल टॉवरवर चढून गावातील पाच समर्थक कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केले.

वाल्मीक कराडला न्याय द्यावा आणि त्याच्यावरील खोटे गुन्हे मागे घ्यावेत’, अशी मागणी करत ग्रामस्थ रस्त्यावर उतरले. यावेळी आंदोलकांनी आमदार सुरेश धस व आमदार संदीप क्षीरसागर यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.

काही कार्यकर्त्यांनी रस्त्यावर टायर जाळण्याचाही प्रयत्न केला. तसेच या आंदोलनात महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. हे आंदोलन दिवसभर सुरू होते. आंदोलनस्थळी ग्रामीण पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.