-संजय शिंदे
दारूची बाटली आडवी करून फलटण तालुक्यातील आळजापूरच्या महिलांनी संघटित शक्तीचे बळ दाखवून दिले आहे. महिलांनी मिळविलेला हा विजय या गावांप्रमाणेच इतर गावांतील सर्वसामान्य महिलांना प्रेरणा देणारा ठरणार आहे.
आळजापूर गाव गेल्या काही महिन्यांपासून दारूबंदी आंदोलनामुळे गाजत आहे. गावातील दारूबंदीसाठी ग्रामस्थांनी अनेकवेळा मोठे प्रयत्न केले. गावातील दारू दुकान बंद करण्यासाठी ग्रामसभा घेण्यात आली. अगदी तत्कालीन उत्पादन शुल्कमंत्र्यांच्या निवासस्थानावर ग्रामस्थांनी मोर्चा काढून निवेदन दिले.
त्यानंतर महसूल विभागाने मतदानाची प्रक्रीया राबवली. दारू दुकान बंद करण्यासाठी गावातील युवकांनी पुढाकार घेतला. महिलांनी मोर्चेबांधणी केली. अगदी मुलांसह गावातून फेरी काढून जनजागृती केली. प्रभावी प्रचार मोहीम राबविली. एकजुटीने प्रयत्न केले. विशेष म्हणजे महिलांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता दिलेली साथ खूप मोलाची ठरली, त्यामुळेच बाटली आडवी झाली. गावातील ९० टक्क्यांहून अधिक महिलांनी बाटली आडवी करण्यासाठी कौल दिला आहे.
आपल्याकडे बहुतेक सगळ्या निवडणुकांमध्ये साधे बहुमत असले तरी चालते. मात्र, दारूचे दुकान बंद करण्यासाठी निव्वळ बहुमत पुरेसे ठरत नाही. झालेल्या मतदानाऐवजी एकूण मतदान गृहीत धरले जाते आणि एकूण मतदानाच्या निम्म्याहून अधिक महिलांचा कौल ग्राह्य धरला जातो. त्यामुळे सध्या असणारा कायदा आणि नियम दारू दुकानदारांच्या पथ्यावर पडून त्यांचे फावत असल्याचे चित्र आहे.
दारूबंदी जाहीर झालेल्या गावांतही कालांतराने संबंधित यंत्रणांच्या काणाडोळ्याने दारूविक्री सुरू राहिल्याचे प्रकार आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर आळजापूरच्या महिलांनी दाखवलेले धैर्य खूप मोलाचे आहे. जिल्ह्यात अनेक गावांत यापूर्वी मतदानाद्वारे दारूबंदीचे ठराव झाले आहेत. काही ठिकाणी या प्रयत्नांना यश आले नाही. मात्र, त्यामुळे निराश होऊन चालणार नाही. सर्वसामान्य वर्गातील, ग्रामीण भागातील महिला धीटपणे आणि डोळसपणे पुढे येत आहेत. जागरूक होत आहेत. आपल्या हक्कांबाबत लढत आहेत. त्यासाठी रणरागिणी बनून रस्त्यावर उतरत आहेत. हे सारे चित्रच आश्वासक व इतर गावांना प्रेरणादायी आहे.