Pankaja Munde News : बारामतीसारखाच विकास मराठवाड्यातही करणार; मंत्री पंकजा मुंडे यांनी केला निर्धार
Saam TV January 16, 2025 06:45 PM

बारामती : अजितदादांच्या प्रदीर्घ अनुभवासह अनेक वर्षे सत्तेत असल्याचा फायदा बारामतीच्या विकासात निश्चित झालेला आहे. बारामतीत झालेल्या विकासकामांच्या धर्तीवरच माझ्या मतदारसंघासह मराठवाड्याचा विकास करण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन; असा निर्धार पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी केला. तसेच पंकजा मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह बारामतीच्या विकासाचे विशेष कौतुक केले.

राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री या बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. यानिमित्ताने बारामतीत विविध विकासकामांच्या उद्घाटनांच्या निमित्ताने आलेल्या राज्याच्या पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी बारामतीच्या विकासाची पाहणी केली. शहरासह मतदारसंघात झालेल्या सर्वांगीण विकासाने त्या भारावून गेल्या; यानंतर त्यांनी मराठवाड्यात देखील बारामतीसारखाच विकास करण्याचा निर्धार केला. 

अजितदादांकडून खूप काही शिकण्यासारखे 

एका वेगळ्या विकासाच्या दृष्टीतून बारामती आणि बारामतीचा विकास बघण्याचा आज योग आला. असे म्हणत बारामतीच्या प्रत्येक विकासकामाकडे उपमुख्यमंत्री यांचे बारकाईने लक्ष असते. दादांच्या व्यक्तिमत्त्वातील काटेकोरपणा, शिस्तबद्धता, वक्तशीरपणा, नियोजनबद्धता, झपाटून काम करण्याची पद्धत यासह खूप काही गोष्टी अजितदादांकडून शिकण्यासारख्या असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या. 

विकासकामांचा दर्जा अत्यंत चांगला 

बारामती मतदारसंघात झालेली विविध विकासकामे, त्यांचा दर्जा अत्यंत चांगला आहे. बारामती मतदारसंघातील प्रत्येक कामावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारकाईने लक्ष असते. त्यांचा दिवस सकाळी सहा वाजता सुरू होतो. प्रत्येक काम नियोजनबद्ध पद्धतीने करण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळेच त्याचे प्रतिबिंब बारामतीतील प्रत्येक विकासकामांमध्ये दिसत आहे. बारामतीच्या विकासाशी अजितदादांचे वेगळे नाते निर्माण झाले असल्याचा उल्लेख देखील मंत्री मुंडे यांनी केला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.