Kareena Kapoor Video: सैफवर हल्ला झाल्यानंतर अशी झालेली करीनाची अवस्था; घराबाहेरील पहिला व्हिडिओ समोर
esakal January 16, 2025 06:45 PM

बुधवारी रात्री अभिनेता सैफ अली खान याच्या बांद्रा येथील घरी चोरी करण्याचा प्रयत्न झाला. त्यात चोराने सैफवर हल्ला चढवला आणि यात सैफ अली खान गंभीर जखमी झाला. सैफच्या पाठीवर, मानेवर आणि हातावर जखमा झाल्यामुळे त्याला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्याच्यावर शस्त्रक्रिया सुरू आहे. मात्र अशातच अभिनेत्री करीना कपूरचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. हा व्हिडिओ सैफवरील हल्ल्याच्या नंतरचा असल्याचं सांगण्यात येतंय.

सैफवर हल्ला झाला तेव्हा करीना घरी नव्हती. ती तिच्या बहिणीच्या घरी गेली होती. बेबो रात्री सोनम कपूर, बहीण करिष्मा कपूर, रिया कपूर यांच्यासोबत गर्ल नाइट एन्जॉय करत होती. त्यावेळी जेह आणि तैमूर सैफसोबत घरी एकटे होते. तेव्हाच त्याच्यावर हल्ला झाला. आता त्या घटनेनंतरचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यात बेबो घरी परत आल्याचं दिसतंय.

या व्हिडिओमध्ये बेबो खूप घाबरलेल्या अस्वस्थेत दिसतेय. ती तिच्या घराच्या बाहेर उभी आहे. तिच्यासोबत तिचे मदतनीस आहेत. त्यातील एक मदतनीस इतरांसोबत बोलताना दिसतेय. ती घडलेली घटना कशी घडली याबद्दल सांगताना दिसतेय. करीना खूप काळजीत दिसतेय. ती पुढे येते आणि पुन्हा काहीतरी विचारण्यासाठी मागे जाते. तिच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसतेय. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

अशातच करीना आणि सैफच्या टीमने त्यांचं ऑफिशिअल स्टेटमेंट जाहीर केलं आहे. त्यांच्या घरी चोरीसाठी आलेल्या व्यक्तीने सैफच्या खांद्याला दुखापत झालीये. या स्टेटमेंटमध्ये त्यांनी सगळ्यांना शांत राहण्याची विनंती केलीये.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.