नवी दिल्ली : नवे वर्ष हे नवी आव्हाने घेऊन आले असून या वर्षामध्ये देशांतर्गत सशस्त्र संघर्ष हे तातडीचे मोठे आव्हान बनले आहे. यामुळे भूराजकीय तणाव वाढला असून विभाजनवादाचा धोका देखील बळावला असल्याचे निरीक्षण ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या’ (डब्लूईएफ) अहवालात नमूद केले.
चुकीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या माहितीने अल्पकाळासाठी मोठे आव्हान उभे केले आहे. मागील दहा वर्षांचा काळ लक्षात घेतला तर टोकाचे हवामान बदल, जैवविविधतेची हानी आणि जैवप्रणालीचा वेगाने विनाश ही देखील आव्हाने बनली असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.
येत्या काही दशकांमध्ये जागतिक राजकारणात देखील मोठी उलथापालथ होणार असून पश्चिमेकडील देशांचा प्रभाव आता कमी होत जाणार आहे. चीन, भारत आणि आखाती देशांतून नवे सत्ता केंद्र उदयाला येवू शकते असे भाकीत या अहवालातून वर्तविण्यात आले आहे.
वैश्विक जोखीम अंदाज सर्वेक्षणाच्या माध्यमातून उद्योग, सरकारी यंत्रणा, शिक्षणक्षेत्र आणि सिव्हिल सोसायटीमध्ये काम करणाऱ्या नऊशेपेक्षा अधिक मान्यवरांची मते जाणून घेण्यात आली होती.
विभाजनवाद्यांना बळजागतिक पातळीवर विभाजनवादी वृत्ती मूळ धरू लागल्या असून भूराजकीय, पर्यावरणीय, सामाजिक आणि तांत्रिक आव्हानांमुळे स्थैर्य आणि प्रगतीला मोठे आव्हान निर्माण झाले आहे. देशांतर्गत सशस्त्र संघर्ष ही यंदाची तातडीची जोखीम आहे. तब्बल एक तृतीयांश तज्ज्ञांनी आपली मते नोंदविताना आव्हानांच्या क्रमावारीमध्ये हेच एक सर्वांत मोठे आव्हान असल्याचे म्हटले आहे.
‘एआय’चे आव्हान मोठेआधुनिक तंत्रज्ञानाच्या उदयामुळे चुकीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या माहितीचे मोठे आव्हान उभे ठाकले असून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विकासामुळे (एआय) जसे काही लाभ होतील तसेच तोटे देखील संभवतात असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. या आव्हानांचा विचार करून विविध देशांच्या नियोजनकर्त्यांना तसा आराखडा देखील तयार करावा लागेल असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
सहकार्याशिवाय पर्याय नाहीआर्थिक विषमता, वाढत जाणारा कर्जाचा डोंगर आणि काही मोजक्या लोकांच्या हातांमध्ये स्रोत एकवटल्याने निर्माण झालेले अस्थैर्य यांचा धोका बळावला आहे. हेच घटक येणाऱ्या काळामध्ये जागतिक आर्थिक स्थैर्यासमोर आव्हान उभे करतील. या आर्थिक आणि भूराजकीय आव्हानांना तोंड देण्यासाठी जागतिक नेत्यांना तातडीने सहकार्याची भावना वृद्धिंगत करावी लागेल असे देखील हा अहवाल सांगतो.
ही आव्हाने मोठी
टोकाचे हवामान बदल
जैवविविधतेचा विनाश
जैवप्रणालीचा विनाश
नैसर्गिक संसाधनांचा
तुटवडा
भूराजकीय तणाव वाढत चालला असून आंतरराष्ट्रीय विश्वासाला देखील तडा जाऊ लागला आहे. वैश्विक तापमानवाढीमुळे कधी नव्हे ते मोठे आव्हान आपल्यासमोर उभे केले आहे. जागतिक पातळीवर विभाजनवादी वृत्ती बळावल्या असून वैश्विक नेत्यांसमोर दोनच पर्याय आहेत एक म्हणजे सहकार्य आणि सामंजस्याला प्रोत्साहन देणे किंवा वाढत्या अस्थैर्याला तोंड देणे.
- मिरेक दुसेक, व्यवस्थापकीय संचालक (डब्लूईएफ)