टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात बॉर्डर गावसकर ट्रॉफी कसोटी मालिका गमवावी लागली. ऑस्ट्रेलियाने 10 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर बॉर्डर गावसकर ट्रॉफी जिंकली. ऑस्ट्रेलियाने ही 5 सामन्यांची मालिका 3-1 अशा फरकाने जिंकली. टीम इंडियाच्या काही खेळाडूंचा अपवाद वगळता इतर सर्वांनी या मालिकेत निराशाजनक कामगिरी केली. खेळाडूंच्या कामगिरीचा स्तर आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पराभव बीसीसीआयच्या चांगलाच जिव्हारी लागलाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. रिपोर्टनुसार, बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर एक कठोर निर्णय घेतला आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या खेळाडूंना खास सुविधेचा लाभ घेता येणार नसल्याचं म्हटलं जात आहे. नक्की काय? जाणून घेऊयात.
रिपोर्टनुसार, बीसीसीआयने काही दिवसांपूर्वी खेळाडूंसह त्यांच्या कुटुंबियांसाठी दौऱ्यावर सोबत राहण्यासाठी कालावधी निश्चित केला होता. त्यानंतर आता बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. रिपोर्टनुसार, बीसीसीआयने खेळाडूंना कोणत्याही मालिकेत सोबत खासगी स्टाफ ठेवण्यावर निर्बंध घातले आहेत.
एएनआयनुसार, टीम इंडियाच्या खेळाडूंना त्यांच्या सोबत त्यांचे वैयक्तिक कूक, हेयर स्टायलिस्ट आणि खासगी सुरक्षा रक्षकांना परदेश दौऱ्यावर सोबत घेऊन जाता येणार नाही. अनेक खेळाडू हे त्यांच्या डायटनुसार कूकला सोबत ठेवतात. याबाबतीत टीम इंडियाचा ऑलराउंडर हार्दिक पंड्या याचं नाव आघाडीवर आहे.
दरम्यान टीम इंडिया मायदेशात इंग्लंडविरुद्ध टी 20I आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. सूर्यकुमार यादव हा या मालिकेत टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर जॉस बटलर याच्याकडे इंग्लंडची धुरा आहे. उभयसंघातील एकूण 5 सामन्यांच्या टी 20I मालिकेला 22 जानेवारीपासून सुरुवात होत आहे. मालिकेतील सलामीचा सामना हा कोलकातामधील इडन गार्डनमध्ये खेळवण्यात येणार आहे.
पहिला सामना, बुधवार 22 जानेवारी, इडन गार्डन
दुसरा सामना, शनिवार 25 जानेवारी, चेन्नई
तिसरा सामना, मंगळवार 28 जानेवारी, राजकोट
चौथा सामना, शुक्रवार 31 जानेवारी, पुणे
पाचवा सामना, रविवार 2 फेब्रुवारी, मुंबई
या मालिकेच्या काही दिवसांआधी खेळाडूंना टीम इंडियात सामील होण्यासाठी कोलकातात एकत्र बोलवण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय खेळाडूंना 18 जानेवारीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. टीम इंडिया टी 20I मालिकेआधी 3 दिवस सराव करणार आहे.