भरधाव कंटेनरचा तब्बल 21 किलोमीटर थरकाप उडवणारा थरार, 15 ते 20 वाहनांना धडक
Marathi January 17, 2025 07:24 AM

चाकण-शिक्रापूर रस्त्यावर तळेगाव चौकात गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास भरधाव कंटेनरने एका दुचाकीला धडक दिली. सुसाट सुटलेल्या पंटेनर चालकाने तळेगाव चौकापासून तब्बल 21 किलोमीटर अंतरापर्यंत रस्त्यावरील 15 ते 20 वाहनांना धडक देत वाहनचालकांच्या काळजाचा अक्षरशः थरकाप उडवला. कंटेनर चालकाला पकडण्याच्या प्रयत्नात असणाऱया पोलिसांच्या कारलादेखील कंटेनरने ठोकरले. वाजेवाडी येथे स्थानिक नागरिकांनी रस्त्यात डंपर आडवा लावून चालकाला पकडले व चोप देऊन त्याला पोलीसांच्या ताब्यात दिले. या अपघातात दोन महिला आणि 11 वर्षांच्या मुलीसह एक वॉर्डन जखमी झाला.

ज्योती ढोले (36), पौर्णिमा गाढवे (27), धनश्री गाढवे (11) आणि वॉर्डन अभिजित कदम (37) अशी जखमींची नावे आहेत. कंटेनर चालक अकिब अब्दुल रज्जाक खान (25) हा नागरिकांच्या मारहाणीत जखमी झाला असून त्याला उपचारासाठी शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. खान हा चाकण येथून शिक्रापूरकडे निघाला होता. तळेगाव चौकात भरधाव पंटेनरने एका मोपेड दुचाकीला धडक दिली. त्या दुचाकीवरून ज्योती, पौर्णिमा आणि धनश्री या तिघी चालल्या होत्या. कंटेनरने धडक दिल्याने दुचाकीवरील तिघीही रस्त्यावर पडल्या. धनश्रीच्या पायावरून पंटेनरचे चाक गेल्याने ती गंभीर जखमी झाली.

अन् थरार थांबला….

रस्त्यात वाहनांना धडक देत निघालेल्या कंटेनरने शेळपिंपळगावजवळ यू टर्न घेऊन पुन्हा चाकणच्या दिशेने प्रवास सुरू केला, मात्र समोरून येणारी असंख्य वाहने पाहून चालक खान याने कंटेनर पुन्हा वळून शिक्रापूरच्या दिशेने गेला. स्थानिक नागरिकांनी व रस्त्यावरील अनेकांनी कंटेनर थांबविण्यासाठी दगडफेक केली, मात्र कंटेनर न थांबता पुढे जातच होता. अखेर वाजेवाडी येथे डंपर आडवा लावून अथक प्रयत्नांनंतर कंटेनरला रस्त्याच्या खाली ढकलले. त्याचवेळी कंटेनर बंद पडल्याने थांबला आणि तब्बल 21 किलोमीटर अंतर सुरू असलेला थरार थांबला.

‘कंटेनर प्रथम एका दुचाकीला धडकला आणि नंतर पळून जाताना इतर वाहनांना धडकला. नऊ ते दहा वाहनांना धडक दिल्याची पुष्टी झाली आहे. चाकण पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले आहे. तो मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत होता का, हे तपासण्यासाठी त्याला वैद्यकीय चाचणीसाठी पाठवण्यात आले आहे.’ – शिवाजी पवार (पोलीस उपायुक्त)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.