'यावर्षी लग्न होता होता रायलं', बुलढाण्यातील टक्कल पडण्याच्या बातम्या ऐकून पाहुणेच आले नाहीत
BBC Marathi January 17, 2025 03:45 AM
BBC ICMR च्या तज्ज्ञांच्या पथकाने गावात येऊन पाहणी केली.

"यंदा लग्नासाठी पोरी पाहायला सुरुवात केली होती. एक पोरगी पाहून आलो. नंतर केस गेले आणि टक्कल पडलं. मग परत पोरगी पाहायला गेलोच नाही. यावर्षी लग्न होता होता रायलं नं. मॅडम आमचे फोटू काढू नका. फोटो गेला तर लोकांना वाटेल बिमारी आली, यांना कायले पोरगी द्यायची?"

केसगळतीच्या अनोख्या प्रकारानं चर्चेत आलेल्या शेगाव तालुक्यातल्या पहुरजिरा गावातल्या 26 वर्षीय आनंदची (बदलेलं नाव) ही व्यथा.

आनंदचे केस 31 डिसेंबरपासून गळत होते. टक्कल पडू लागल्यानं त्यानं सलूनमध्ये जाऊन थेट टक्कल केलं. त्यानंतर पुन्हा केस उगवले. पण परत केसगळतीही सुरू झाली.

अशाप्रकारे पुन्हा केसगळती होणाऱ्यांमध्ये काही मोजक्या रहिवाशांचा समावेश आहे.

बुलढाण्यातील केसगळतीच्या या रुग्णांचा आकडा 188 वर पोहोचला आहे. शेगाव तालुक्यात 181 तर नांदुरा तालुक्यात 7 रुग्ण आहेत. हा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. बोंडगाव आणि पहुरजिरा ही दोन गावं सर्वाधिक बाधित आहेत.

इंडियन काऊन्सिल ऑफ मेडीकल रिसर्चच्या शास्त्रज्ञांनी बाधित गावांमध्ये भेट दिली. भोपाळ, चेन्नई, पुणे आणि दिल्लीवरून आलेल्या या टीमनं रुग्णांच्या केसांचे, नखांचे, रक्ताचे, लघवीचे, गावातल्या पाण्याचे नमुने गोळा केले.

यावर संशोधन झाल्यानंतर त्याचा अहवाल अल्यावर रुग्णांची इतकी मोठ्या प्रमाणात केसगळती का होत आहे? हे समजू शकणार आहे.

BBC

BBC लोकांना नेमकी कशाची भीती वाटते?

आयसीएमआरची टीम सुरुवातीला शेगांव तालुक्यातील बोंडगावात येणार असल्यानं आम्हीही तिथं पोहोचलो. त्यावेळी मंदिरात हळू-हळू रुग्ण जमा होत होते.

टीमनं याच ठिकाणी त्यांची तपासणी केली. यावेळी आम्ही रुग्णांसोबत बोलण्याचा प्रयत्न करत होतो. पण, अनेक रुग्णांनी कॅमेऱ्यावर बोलण्यास नकार दिला. कारण, या रुग्णांमध्ये वेगळी भीती दिसत होती.

BBC काही जणांनी सोशल मीडियावर या प्रकरणाची थट्टाही उडवली आहे.

पहुरजिऱ्यातील आनंदला जी वाटत होती तीच भीती इथंही होती. बोंडगावातील 55 वर्षीय पार्वती (बदललेलं नाव) यांनी ती बोलून दाखवली.

"माझ्या पोराचे केस गेले. त्याच्या लग्नाची बोलणी सुरू होती. टीव्हीवर टक्कल पडल्याचं दिसलं तेव्हा सोयऱ्याचा फोन आला. आम्ही सोयरीक करू शकत नाही, असं सांगितलं, " असं पार्वती म्हणाल्या

"माझा पोरगा तर गावात कोणाच्या समोर येत नाही. तो त्याच्या कामावरच राहतो," असंही त्यांन सांगितलं.

पार्वती भीती बोलून दाखवतच होत्या, तेव्हाच तिथे बसलेल्या 65 वर्षांच्या आजी म्हणाल्या, "सोयरीकीचं काम आहे न बाई, बदनामी झाली तर पाहुणे येत नाही."

या भीतीमुळं गावातली काही तरुण मुलं-मुली समोर येऊन बोलायला घाबरत होते.

'कॉलेजात असं कसं जाऊ?'

काही महिलाही समोर यायला घाबरत होत्या. या महिलांमध्ये इतकी भीती का आहे? याबद्दल बोंडगावचे सरपंच रामा पाटील थारकर म्हणाले की, "भीती असणं साहजिकच आहे ना. कारण, पुरुषांचे केस गेले तर आठ दिवसांत परत येतील. पण, महिलांना भीती जास्त वाटते. कारण, त्यांचे आधी जसे केस होते तसे केस यायला कितीतरी वर्ष जातात. त्या स्वतःला असं कधी पाहून नाही, तर मग त्यांना भीती वाटणारच ना."

BBC केसगळती प्रकरणाची चौकशी करणारे पथक.

या गावांमध्ये फिरताना आणखी एक जाणवलं. ते म्हणजे शाळा-कॉलेजमध्ये इतर विद्यार्थी चिडवत असल्याची तक्रारही काही विद्यार्थी करत होते.

संदेश सुराडकर हा विद्यार्थी बारावीला आहे. केस गळाल्यानं आता कॉलेजमध्ये जायचं कसं? ही भीती त्यानं बोलून दाखवली.

तो म्हणाला "माझे बारावीचे पेपर आहेत. आता कॉलेजमध्ये जाणं गरजेचं आहे. पण, हे असे केस घेऊन कसं जाऊ? मित्र चिडवतील."

'कायदेशीर कारवाई करणार?'

या गावामधले सर्व लोक सुरुवातीला स्वतः पुढं येऊन बोलत होते. मग लोकांमध्ये इतकी भीती का पसरली?त्याचं कारण म्हणजे काही लोकांनी सोशल मीडियावर खिल्ली उडवली.

काही लोकांनी मिम्स तयार केले, तर काही छोट्या युट्यूब चॅनल्सने खिल्ली उडवणारे व्हीडिओ व्हायरल केले. यामुळं लोक आता समोर यायला घाबरतात.

पण, ज्या लोकांनी खिल्ली उडवली त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करणार आहे. हा काही खिल्ली उडवण्याचा विषय नाही, असं बोंडगावचे सरपंच रामा पाटील थारकर सांगतात.

लोकांनी घाबरण्याची गरज आहे का?

बोंडगावनंतर आम्ही पहुरजिरा इथं पोहोचलो. इथल्या काही महिला बोलायला स्वतःहून पुढं येत समस्या सांगत होत्या.

60 वर्षीय कावेरी धाळोकार यांचे केस कंबरेच्या खालपर्यंत येतील एवढे लांब होते. मोठी वेणी असायची. पण, आता केस इतके गळाले की साधी वेणी पडणंही कठीण झालंय. डोक्यावर काही ठिकाणी टक्कल दिसतंय.

त्या म्हणाल्या, "सुरुवातीला थोडे केस जात होते. नंतर मी कंगव्यानं केस विंचारले, त्यात खूप सारे केस गेले. धुतले तर पूर्णच केस गळाले. इतके लांब केस गेले तर वाईट वाटतं."

BBC गळती झालेले केस आजीने जमा करून ठेवले आहेत.

गळालेले केस त्यांनी एका पिशवीत सांभाळून ठेवले आहेत.

कावेरी आपली व्यथा सांगतच होत्या तेव्हा तिथे काही लोकांनी घोळका केला होता. त्यातला एक व्यक्ती म्हणाला, "त्यांच्या जवळ नको जाऊस, हा व्हायरस आहे आपल्यालाही होईल."

काही मिनिटांतच दुसऱ्या दोन महिला म्हणाल्या, हा व्हायरस आहे का जी? एकाला झाला तर दुसऱ्यालाही होते का?

थोडक्यात हा संसर्गजन्य आहे का? असं त्यांना विचारायचं होतं.

किती भीती, काय काळजी घ्यावी?

खरंच या केसगळतीमुळे इतकं घाबरण्याची गरज आहे का? सोयरिकीसाठी नकार देण्यापर्यंत लोकांनी काळजी करण्याची गरज आहे का? याबद्दल आम्ही तपासणीसाठी आलेले दिल्ली एम्सचे तज्ज्ञ डर्माटोलॉजिस्ट डॉ. सोमेश गुप्ता यांच्यासोबत बोललो.

ते सांगतात, "ज्यांचे केस सुरुवातीला गेले होते. त्यांचे केस परत यायला सुरुवात झाली आहे. खूप काळापर्यंत ही समस्या चालेल असं वाटत नाही. परत येणारे केस पण चांगले आहेत.

केस मुळापासून गळत नाहीत. पर्मनंट हेअर लॉस नाही. लोकांनी घाबरू नये. केसगळती झालेले लोक लवकरच बरे होतील. व्हायरसचं इन्फेक्शन असल्याचं दिसत नाही. तसेच खूप संसर्गजन्यही दिसत नाही.

एकाच घरात अनेक लोकांना केस गळतीचा त्रास होताना दिसतोय. परंतु घरातल्या एकाला झाला तर बाकीच्यांना पण होतोय असं आपण ठामपणे म्हणू शकत नाही. लोकांनी घाबरून जाऊ नये आणि कोणासोबतही भेदभाव करू नये."

BBC

पण, ज्यांची केसगळती झाली अशा रुग्णांनी स्वतःसाठी काय काळजी घ्यायला पाहिजे? याबद्दल आयसीएमआरच्या तज्ज्ञ डॉ. शीला गोडबोले सांगतात, "रुग्णांनी शाम्पू, तेल वापरताना काळजी घ्यावी. तसेच स्वतःचा कंगवा स्वतः वापरावा. काही दिवस तरी त्यांना हे करायला हवं. पण, लोकांना घाबरण्याची फार गरज नाही."

सध्या केस का गळत आहेत? याचं कारण अजूनही समोर आलं नाही. आता सगळ्या चाचण्यांचे अहवाल समोर आल्यानंतर याचं कारण समोर येईल. सध्या रुग्णांना लक्षणांनुसार होमिओपॅथीचं औषध आयुष मंत्रालयाकडून देणं सुरू आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.