मुणगे यात्रोत्सवानिमित्त परिसरात भक्तिमय वातावरण
esakal January 17, 2025 10:45 PM

39278

मुणगे यात्रोत्सवानिमित्त
परिसरात भक्तिमय वातावरण
सकाळ वृत्तसेवा
मुणगे, ता. १७ः ‘श्री देवी भगवती माते नमो नम:’ अशा मंत्रघोषाने देवी भगवती मंदिरातील वातावरण भक्तीमय झाले. यात्रोत्सवानिमित्त
भाविकांची ये-जा सुरु आहे.
मुणगेतील देवी भगवतीचा यात्रोत्सवास १३ पासून सुरू झाली आहे. आज या यात्रोत्सवाचा शेवटचा दिवस आहे. या कालावधीत देवी भगवती मंदिरात विविध कार्यक्रम झाले. विद्यार्थ्यांपासून मोठ्यांपर्यत सर्वांनी या यात्रोत्सवात सहभाग घेत किर्तन तसेच भक्तीगीते सादर केली. या सर्वांचे मंदिराच्यावतीने सत्कार करण्यात आले. तसेच देवीच्या दर्शनासाठी माहेरवाशिणीनी मोठ्या भक्तीभावाने येऊन देवीची मन:पुर्वक ओटी भरली. देवीच्या पायावर मस्तक ठेवून आपल्या इच्छा, गाऱ्हाणी देवीसमोर मांडल्या. गेल्या चार दिवसामध्ये विविध मान्यवरांनी देवी भगवतीच्या यात्रोत्सवाच्या निमित्ताने मुणगे गावास भेटी दिल्या.
मुणगे गावचे सुपुत्र आणि माजी राज्य सभा सदस्य व मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी पहिल्याच दिवशी देवीचे दर्शन घेतले. यात्रोत्सवात रात्री देवीची पालखी काढण्यात येते. हा एक अमुल्य क्षण असतो. यात अनेक ग्रामस्थ, भाविक श्रध्देने सहभागी होतात. ठिकठिकाणी पालखी थांबा घेते. त्याठिकाणी भक्ती गीताने देवीची आराधना केली जाते. गोंधळी गायन होते तर भाविक सुध्दा देवीची भक्ती गीताने आराधना करतात. हा पालखी प्रदक्षिणा सोहळा झाल्यानंतर मंदिरात गोंधळी गायन होते. त्यानंतर किर्तन होते. या सोहळ्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यासह मुंबई, गोवा, रायगड रत्नागिरी आदी ठिकाणाहून मोठमोठे वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि भाविक वर्ग मोठ्या श्रध्दने सहभागी होतात.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.