बीड - मस्साजोग (ता. केज) येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण व निर्घृण हत्या प्रकरणातील सहा आरोपींच्या ‘सीआयडी’ कोठडीची मुदत शनिवारी (ता. १८) संपणार असल्याने या आरोपींना विशेष मकोका’ न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या आरोपींवर खुनासह ‘मकोका’चा तर काहींवर ‘ॲट्रॉसिटी’चाही गुन्हा आहे.
देशमुख यांचे नऊ डिसेंबर २०२४ रोजी अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचा तत्कालीन केज तालुकाध्यक्ष विष्णू चाटे, सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, जयराम चाटे, सुधीर सांगळे, महेश केदार व प्रतीक घुले यांच्यावर खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला.
यातीलच चाटे वगळता इतरांवर ‘ॲट्रॉसिटीचा’ही गुन्हा नोंद आहे. ‘मकोका’ अंतर्गत गुन्हा नोंद झालेल्या सुदर्शन घुले, सांगळे, सिद्धार्थ सोनवणे या तिघांसह महेश केदार, चाटे व प्रतीक घुले यांची ‘सीआयडी’ कोठडीची मुदत उद्या संपत आहे. तपास अधिकारी बदलले.
आरोपींवर ‘मकोका’ (संघटतील गुन्हेगारी नियंत्रण कायदा) कलमाने गुन्हा नोंद असल्याने असा तपास या विभागातील उपअधीक्षकापेक्षा वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे असणे अपेक्षित असते. त्यामुळे आता गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस उपअधीक्षक अनिल गुजर यांच्याऐवजी ‘एसआयटी’मधील अपर पोलिस अधीक्षक किरण पाटील या गुन्ह्याच्या तपास अधिकारी असतील.
आवादा कंपनीच्या कामगाराचा मृतदेह आढळला
केज, (जि. बीड) - सरपंच संतोष देशमुख हत्या आणि खंडणीसंदर्भातील प्रकरण चर्चेत असतानाच आवादा एनर्जी कंपनीत काम करणाऱ्या एका कामगाराचा मृतदेह केज-अंबाजोगाई रस्त्यावरील एका हॉटेलसमोर आज सकाळी आढळला. हा मृतदेह गुरुदासपूर (पंजाब) येथील राजपाल हमीद मसीह या कामगाराचा असल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शहरातील उपजिल्हा रुग्णालयात पाठविला आहे. त्याचा मृत्यू सर्पदंशाने झाल्याची चर्चा आहे.
‘दिंडोरी दरबाराचा ‘त्या’ व्यक्तीशी संबंध नाही’
दिंडोरी - ‘दिंडोरी प्रधान सेवा केंद्रात दत्त जयंतीच्या सप्ताहाला लाखो भाविकांप्रमाणेच संबंधित व्यक्तीही दर्शनासाठी येऊन गेली असावी. त्याबाबतचे सीसीटीव्ही चित्रण आम्ही तपास यंत्रणेला दिले आहेत, मात्र या व्यक्तीने मुक्काम केला किंवा त्याला ‘व्हीआयपी’ वागणूक देण्यात आली, या आरोपात काहीही तथ्य नाही, असे दिंडोरी दरबाराचे आबासाहेब मोरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केलेल्या विधानावर सेवामार्गातर्फे मोरे यांनी खुलासा केला.