जेवणादरम्यानचे संस्कार
esakal January 18, 2025 09:45 AM

मुलांसोबत जेवताना काही मूलभूत गोष्टी समजून घेऊ. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेवताना पालकांच्या डाव्या हाताला मूल असावे. जेवताना कधी कधी मुलांना ठसका लागतो, उचकी लागते, घास चावताना अनवधानाने जीभ चावली जाते. अशा वेळी मुलांना पालकांच्या मदतीची गरज असते.

जेवताना पालकांचा डावा हात मोकळा असतो. त्यामुळे मुलाच्या पाठीवरून हात फिरवणे, त्याला पटकन पाणी देणे, त्याला जवळ घेऊन थोपटणे सहज शक्य होते. पण अशा वेळी मुलगा पालकांच्या उजवीकडे बसला असेल, तर पालकांची तारांबळ होते आणि मुलाचा त्रास वाढत जातो.

मुलाला उचकी लागते, ठसका लागतो, अशा वेळी मुलाला तुमच्या शरीरस्पर्शाची गरज असते. मुलाला प्रेमाने थोपटणे, त्याच्या पाठीवरून हलकेच हात फिरवत राहणे पालकांकडून अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे त्यावेळी मुलावर सूचनांचा आणि उपदेशांचा भडिमार न करणे, त्याला ज्ञानामृत न पाजणे ही अपेक्षित असते. पालकांनी ‘असे केले’, तर मुले दुखावली जातात आणि पुढच्या वेळी उचकी लागल्यास किंवा ठसका लागल्यास पालकांपासून लांब पळतात.

मुले जेवताना कधीकधी कोशिंबिरीतला, भाजीतला किंवा इतर कुठल्या पदार्थातला मिरचीचा बारीक तुकडा अनवधानाने चावतात आणि मग हंगामाच सुरू होतो. मुले ओरडू लागतात, जागा सोडतात, रडतात. आणि मोठी माणसे ‘नेमकी चूक कुणाची?’ यावर चर्चासत्र सुरू करतात.

हे टाळण्यासाठी जेवायला बसताना एका छोट्याशा वाटीत थोडीशी साखर घेऊन ठेवावी. उचकी लागली असेल, तर चिमूटभर साखर खाऊन पाणी प्यायलं, की उचकी थांबते. चुकून मिरची चावली असेल, तर थोडी साखर जिभेवर ठेवून चघळली, तर जिभेची आग-आग कमी होते आणि जेवण संपताना मुलांसाठी ही ‘छोटी स्वीट डिश’ही होऊ शकते.

आता टेबलावर; पण मुलांच्या समोर बसून जेवणाऱ्या पालकांसाठी. समोरासमोर बसलं, तरी आपली मूलकेंद्री ‘उजवी-डावी पद्धत’ येथे लागू आहेच. मात्र, इथे आणखी एक गोष्ट महत्त्वाची असते. पालक मुलासमोर जेवायला बसतात, तेव्हा त्यांच्या उंचीमधला फरक प्रकर्षाने जाणवतो.

अशा वेळी पालक समोर बसलेल्या मुलाशी बोलताना ताठ मानेने बोलत असतील, तर त्याचा मुलाला तीन प्रकारे त्रास होण्याची शक्यता असते: एक म्हणजे मुलाला वर तोंड करून बोलावं लागतं आणि त्यामुळे घास चावताना आणि गिळतानाही त्रास होऊ शकतो. दुसरं म्हणजे, वर तोंड करून पातळ, सरसरीत पदार्थाचा घास घेताना अंगावर सांडण्याची भीती असते.

हा पदार्थ गरम असेल, तर चटका लागण्याची भीती असते. कपड्यावर डाग पडतो तो भाग वेगळाच. तिसरं म्हणजे, सतत वर तोंड करून घास गिळल्यास उचकी किंवा ठसका लागण्याचा संभव असतो. म्हणून जेवताना मुलांच्या समोर बसलेल्या पालकांनी मुलांशी बोलताना मान किंचित झुकवून बोलावे. यामुळे मुलाचे आणि घराचे आरोग्य चांगले राहण्याची शक्यता दुणावते.

‘मुलांसोबत मूल होऊन चवीचवीने जेवा, मग कुणालाच ठसका लागत नाही’ ही चिनी म्हण तुम्ही ऐकलीच असेल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.