नांदेड : किनवट येथील एका महिलेची दहा लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. एक ते चार जानेवारी दरम्यान भामट्यांनी दहा लाखांची फसवणूक केल्याची बाब समोर आली आहे.
फिर्यादी सपना श्रीकांत कागणे यांच्या मोबाइलवर फोन करून सिमकार्ड बंद होणार असल्याचे सांगून त्यांच्याकडून ओटीपी प्राप्त करून घेतला.
याआधारे फिर्यादीच्या कॅनरा बँकेच्या खात्यातील एकूण दहा लाख एक हजार ७०९ रुपये काढून आरोपीने फसवणूक केली.फिर्यादी सपना कागणे यांनी किनवट पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोस्टे किनवट येथे आयटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलिस निरीक्षक चोपडे करत आहेत. नागरिकांनी अशा प्रकारच्या फोन कॉल्सपासून सावध राहावे असे आवाहन करण्यात येत आहे.