ST Buses : भाडेतत्त्वावर बसेस नकोच, एसटीकडून दरवर्षी ५००० बस खरेदी, राज्य सरकारचा निर्णय
Saam TV January 18, 2025 12:45 PM

ST Bus News in Marathi : एसटी महामंडळ दरवर्षी स्वमालकीच्या पाच हजार साध्या बस खरेदी करणार आहे. यासाठी महामंडळांतर्गत पंचवार्षिक नियोजन करण्यात येणार आहे, असा निर्णय आज परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला. तसेच महामंडळात यापुढे कुठल्याही पद्धतीने भाडेतत्त्वावर बसेस न घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही त्यांनी घेतला.

परिवहन आयुक्त कार्यालयात शुक्रवारी (ता. १७) एसटी महामंडळ कामकाज आढावा बैठक परिवहनमंत्री सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. बैठकीस एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांच्यासह सर्व खात्यांचे प्रमुख उपस्थित होते.

परिवहनमंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, की नवीन बस खरेदी करताना पुढील पाच वर्षांत स्क्रॅपिंग (प्रवासी सेवेतून बाद) होणाऱ्या बसचा विचार करण्यात यावा. याबाबत सर्वांगीण अभ्यास करून पंचवार्षिक योजना आणावी. एसटी महामंडळात इलेक्ट्रिक बस घेण्यात येत आहेत. यासाठी प्रत्येक आगारात चार्जिंग स्टेशन प्राधान्याने उभारण्यात यावे, महामंडळाने उत्पन्न वाढीसाठी पूरक योजना आणाव्यात, कर्मचाऱ्यांचे वेतन प्रत्येक महिन्याच्या ७ तारखेपर्यंत देण्याची काळजी घेण्यात यावी, पगाराला कुठल्याही परिस्थितीत उशीर होता कामा नये, शासनाकडून महामंडळाला मिळणारा निधी आगाऊ स्वरूपात मिळण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचनाही परिवहनमंत्री सरनाईक यांनी दिल्या.

नवीन जाहिरात धोरण आणावे

एसटी महामंडळाने नवीन जाहिरात धोरण आणावे. नवीन येणाऱ्या बसवर दोन्ही बाजूला आणि मागील बाजूस डिजिटल जाहिरातीची व्यवस्था असावी. जाहिरात धोरणासाठी अन्य बाबी तपासून यातून मिळणारे उत्पन्न १०० कोटींपर्यंत आणण्याचे उद्दिष्टही ठेवण्यात यावे. महामंडळाच्या बसेसला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या रस्त्यांवर टोल माफी मिळण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात यावा. तसेच डिझेलवरील व्हॅटमध्ये सवलत देण्यासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात यावा, असेही परिवहनमंत्री सरनाईक म्हणाले.

उत्पन्न वाढीसाठी पर्याय निर्माण करा

एसटी महामंडळाच्या प्रत्येक डेपोमध्ये डिझेल पंप आहे. या पंपांव्यतिरिक्त व्यावसायिक दृष्टिकोनातून उपयोगी ठरतील असे डिझेल पंप सुरू करून उत्पन्न वाढीसाठी पर्याय निर्माण करण्यात यावा. याबाबत इंधन कंपन्यांची करार करावा, अशा सूचनाही परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिल्या.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.