IND vs ENG : इंग्लंडने विजयी रथ रोखला, पराभवाचा वचपा घेतला, टीम इंडियावर 4 धावांनी मात
GH News January 18, 2025 08:09 PM

इंग्लंडने दिव्यांग चॅम्पियन्स ट्रॉफी टी 20 स्पर्धेत टीम इंडियाचा विजयी रथ रोखला आहे. इंग्लंडने टीम इंडियावर थरारक झालेल्या सामन्यात 4 धावांनी विजय मिळवला आहे. इंग्लंडने यासह टीम इंडियाला सलग पाचवा विजय मिळवण्यापासून रोखलंय. इंग्लंडने टीम इंडियाला विजयासाठी 170 धावांचं आव्हान दिलं होतं. टीम इंडियानेही जोरदार प्रतिकार करत सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत खेचला. मात्र टीम इंडियाला 165 धावाच करता आल्या. इंग्लंडने यासह गेल्या पराभवाचाही वचपा घेतला आहे. टीम इंडियाने इंग्लंडला 14 जानेवारीला 29 धावांनी पराभूत केलं होतं.

सामन्यात काय झालं?

इंग्लंडने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 169 धावा केल्या. इंग्लंडसाटी एलेक्स हॅमंड याने सर्वाधिक धावा केल्या. एलेक्सने 33 बॉलमध्ये 55 धावांची खेळी केली. त्यामुळे टीम इंडियाला विजयासाठी 170 धावांचं आव्हान मिळालं. हा सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत गेला. त्यामुळे कोण जिंकणार? याबाबत धाकधुक वाढीस लागली. मात्र इंग्लंडने बाजी मारली. इंग्लंडने टीम इंडियाला विजयी आव्हानापासून 5 धावांआधीच रोखलं. टीम इंडियाला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 165 धावाच करता आल्या. टीम इंडियासाठी नरेंद्र मंगोरे याने सर्वाधिक धावा केल्या. नरेंद्रने 24 बॉलमध्ये 43 रन्स केल्या.

इंग्लंडने विजयी रथ रोखला, पराभवाचा वचपा घेतला

टीम इंडियाने या स्पर्धेत पाकिस्तान, इंग्लंड, श्रीलंका आणि पुन्हा पाकिस्तानला पराभूत करत विजयी चौकार लगावला. टीम इंडियाने इंग्लंडला 14 जानेवारीला 29 धावांनी पराभूत केलं. तर आता या सामन्यात टीम इंडियाकडे इंग्लंडवर दुसरा तर एकूण पाचवा विजय मिळवण्याची संधी होती. मात्र इंग्लंडने पलटवार केला. टीम इंडियाचा विजयी रथ रोखला आणि 14 तारखेच्या पराभवाचा वचपा घेतला.

इंग्लंड 4 धावांनी विजयी

दरम्यान टीम इंडिया आता साखळी फेरीतील शेवटचा सामना हा रविवारी 19 जानेवारीला खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला दुपारी 1 वाजता सुरुवात होणार आहे.

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : विक्रांत केणी (कर्णधार), रवींद्र संते (उपकर्णधार), योगेंदर भरोदीया, आकाश पाटील, सन्नी गोयट, नरेंद्र मंगोरे, जितेंद्र व्ही एन, सुरेंद्र कोरवाल, निखील मनहास, अखिल रेड्डी आणि राधिक प्रसाद.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.