चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी 15 खेळाडूंच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. यात जसप्रीत बुमराहचा फिटनेसची समस्या आहे. त्यामुळे त्याच्याबाबत आताच काही सांगणं कठीण आहे. त्याच्याऐवजी इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत हार्षित राणा खेळणार आहे. पहिल्या दोन वनडे मालिकेसाठी जसप्रीत बुमराह नसेल. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, 2 फेब्रुवारीला जसप्रीत बुमराहचं स्कॅनिंग होईल. त्यानंतर काय तो निर्णय घेतला जाईल. दरम्यान, वनडे वर्ल्डकप खेळलेल्या संघापेक्षा हा संघ काही अंशी वेगळा आहे. या संघात मोहम्मद सिराजला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. मोहम्मद सिराजला इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेतून आणि चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतून वगळण्यात आलं आहे. मोहम्मद सिराज वनडे वर्ल्डकप 2023 आणि टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेत खेळला होता. तसेच या संघातून संजू सॅमसनला डावलण्यात आलं आहे. त्याने टी20 फॉर्मेटमध्ये चांगली कामगिरी केली होती.
मोहम्मद सिराजला डावलणं हा निर्णय आश्चर्याचा धक्का देणारा होता. पण याबाबत त्याची संघात का निवड झाली नाही हे कर्णधार रोहित शर्मा याने सांगितलं. ‘सिराज नव्या चेंडूने टीमसाठी गोलंदाजी करत नाही आणि जेव्हा चेंडू जुना होतो तेव्हा तो तितक्या प्रभावीपणे गोलंदाजी करत नाही. आम्हाला अशा गोलंदाजाची गरज आहे की तो नव्या आणि जुन्या चेंडूने प्रभावी ठरू शकेल.’, असं रोहित शर्मा याने सांगितलं.
जसप्रीत बुमराहबाबतही रोहित शर्माने मत मांडलं. ‘त्याला दुखापत आहे आणि अशा स्थितीत आम्ही काही निश्चित सांगू शकत नाही. जर तो नसेल तर त्याच्या जागी जबाबदारी घेईल असा गोलंदाज हवा होता. त्यामुळे आम्ही अर्शदीप सिंगची निवड केली आहे. आम्हाला असा गोलंदाज हवा की जो फ्रंट आणि बॅकला गोलंदाजी करेल. अर्शदीप जास्त वनडे खेळला नाही. पण व्हाईट चेंडूने चांगली कमगिरी करत आहे. म्हणून त्याला अनुभव नसला तरी आम्हाला त्याची चिंता नाही. आम्ही सर्वांना खूश करू शकत नाही. पण आम्ही तोच संघ निवडतो जो गेम जिंकू शकतो.’, असं रोहित शर्मा म्हणाला.