आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेसाठी अखेर भारतीय क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. निवड समितीने या स्पर्धेसाठी युवा आणि अनुभवी खेळाडूंसह संमिश्र संघ तयार केला आहे.चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी 15 सदस्यीय संघ जाहीर करण्यात आला आहे. रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. मात्र उपकर्णधार पदामुळे एकच चर्चा पाहायला मिळत आहे. टीम इंडियात हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, केएल राहुल आणि विराट कोहली यांसारखे अनुभवी खेळाडू असूनही 25 वर्षीय युवा खेळाडूला उपकर्णधार करण्यात आलं आहे. त्यामुळे एकच चर्चा रंगली आहे.
टीम इंडियासाठी वनडेत द्विशतक करणाऱ्या शुबमन गिल याला इंग्लंड विरूद्धच्या वनडे सीरिजसाठी आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी उपकर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. शनिवारी 18 जानेवारीला मुंबईतील बीसीसीआयच्या मुख्यालयात निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर आणि कर्णधार रोहित शर्मा यांची पत्रकार परिषद पार पडली. अजित आगरकर यांनी या दरम्यान संघ जाहीर करताना शुबमन गिल याला उपकर्णधार करण्यात आल्याचं जाहीर केलं. टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीआधी इंग्लंडविरुद्ध 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे.
तसेच शुबमन गिल कर्णधार रोहित शर्मासोबत ओपनिंग करणार असल्याचं निश्चित समजलं जात आहे. शुबमनने श्रीलंकेविरुद्ध उपकर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. तसेच गिलने आयपीएलमध्ये गुजरातचंही नेतृत्व केलंय. त्यामुळे गिलला या अनुभवाचा आंतरराष्ट्रीय पातळीवर फायदा होईल, असं म्हटलं जात आहे. गिलने टीम इंडियासाठी अनेकदा मॅचविनिंग खेळी केली आहे. गिलने वनडेत डबल सेंच्युरीही केली आहे.
गिलकडे मोठी जबाबदारी
शुबमन गिल याने 2019 साली टीम इंडियासाठी एकदिवसीय पदार्पण केलं. गिलने तेव्हापासून 47 सामन्यांमध्ये 6 शतकं आणि 13 अर्धशतकांसह 2 हजार 328 धावा केल्या आहेत.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल (उपकर्णधार) , विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह, यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा.