मोठी बातमी! उत्तम जानकरांचा मोठा निर्णय, शरद पवारांचा शिलेदार देणार राजीनामा
GH News January 18, 2025 09:09 PM

राज्यात पुन्हा एकदा ईव्हीएमचा मुद्दा तापण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं. तर महायुतीला मोठा धक्का बसला होता. अनेक दिग्गज उमेदवारांना पराभवाचा धक्का बसला. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं जोरदार पुनरागमन केलं, तर महाविकास आघाडीचा जोरदार पराभव झाला. महायुतीनं राज्यात 232 जागा जिंकल्या तर महाविकास आघाडीचे तीन पक्ष मिळून केवळ 50 जागाच जिंकता आल्या.

त्यानंतर आता विरोधकांकडून सातत्यानं ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्यात येत आहे. याच मुद्द्यावर आता माजी मंत्री  बच्चू कडू आणि आमदार उत्तमराव जानकर दिल्ली येथे 23 जानेवारीला मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेणार आहेत. त्यानंतर आमदार उत्तमराव जानकर आपल्या आमदारकीचा राजीनामा निवडणूक आयोगाकडे सादर करणार आहेत.

माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावानंतर धानोरे गावातून देखील ईव्हीएमला विरोध होत आहे.  माळशिरस तालुक्यातील धानोरे गावात हात उंचावून पुन्हा मतदान घेण्यात आलं. यावेळी उत्तम जानकर यांना EVM मध्ये 963 मते धानोरे गावात पडली होती तर हात उंचावून प्रत्यक्ष मतदान घेतल्यानंतर त्यांना 1206 मते पडली. त्यामध्ये 243 मतांचा फरक पडला.

धानोरे आणी मरकडवाडी गावातील हजारो मतदारांनी बॅलेट पेपरवर मतदान घ्यावे असे प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाच्या नावे तयार केले आहे. ते प्रतिज्ञापत्र 23 जानेवारीला निवडणूक आयोगाला प्रत्यक्ष जाणून देणार असल्याचं उत्तम जानकर यांनी म्हटलं आहे.  बच्चू कडू आणि आमदार उत्तम जानकर हे 23 जानेवारीला दिल्लीला जाऊन मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेणार आहेत. आमदार उत्तम जानकर आपल्या आमदारकीचा राजीनामा यावेळी 23 जानेवारी रोजी निवडणूक आयोगाकडे सादर करणार आहेत.  निवडणूक आयोगाने माळशिरस विधानसभा मतदारसंघात जर पोट निवडणूक जाहीर नाही केली तर दिल्ली येथे 25 जानेवारीपासून जंतर मंतरवर आंदोलन करणार असल्याचा इशाराही यावेळी उत्तम जानकर यांनी दिला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा ईव्हीएमचा मुद्दा तापण्याची शक्यता आहे. ईव्हीएमच्या मुद्द्यावर सुरुवातीपासूनच उत्तम जानकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.