अंबाजोगाई : बीड जिल्ह्यातील ममदापूर पाटोदा (ता. अंबाजोगाई) येथील महिला सरपंचाला गावातील उपसरपंच आणि अन्य दोन ग्रामपंचायत सदस्यांनी एक लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे.
ममदापूर पाटोदा येथील महिला सरपंच मंगल राम मामडगे यांनी तक्रार दिली, की १६ ऑगस्ट २०२४ रोजी त्या गावच्या जिल्हा परिषद शाळा दुरुस्ती कामाची पाहणी करत होत्या. यावेळी वसंत सोपान शिंदे, अनिल लालासाहेब देशमुख व ज्ञानोबा श्रीमंतराव देशमुख हे शाळेजवळ आले.
एकमेकांना बोलत असताना गावातील दोन व्यक्तींसमोर त्यांनी सरपंचांना शाळा दुरुस्तीच्या कामासाठी आलेल्या चार ‘लाख रुपयांपैकी एक लाख रुपये आम्हाला द्या, अशी मागणी केली. पैसे न दिल्यास तुम्हाला गावातील कोणतेच काम करू देणार नाही.
तसेच, तुमच्याविरुद्ध तक्रार अर्ज देऊत. पूर्वीच्या माजी महिला सरपंचांनी आम्हाला पैसे न दिल्यामुळे त्यांना जेलमध्ये जावे लागेल. तशीच तुमची अवस्था वाईट करून टाकू,’ अशी धमकी त्यांनी दिली.
याबाबत मंगल मामडगे यांनी त्याचवेळी या लोकांविरुद्ध ऑनलाइन तक्रार केली होती. त्यामुळे बुधवारी (ता. १५) प्रत्यक्ष पोलिस ठाण्यात जाऊन आपण तक्रार नोंदवल्याचे या महिला सरपंचांनी तक्रारीत नमूद केले आहे.