साहित्य जगत – अर्पणपत्रिकेने केलेली पंचाईत
Marathi January 19, 2025 08:24 PM

>> रविप्रकाश कुलकर्णी

पुस्तकाला अर्पणपत्रिका का हवी आणि कशासाठी अशा विचारापासून ते पुढचे पुस्तक कोणाला अर्पण करायचे या विवंचनेत पडलेले काही लेखक दिसतात. नीरद चौधरी यांच्या ‘द ऑटोबायोग्राफी ऑफ ऑन अननोन इंडियन’च्या अर्पणपत्रिकेने इतका गदारोळ उठला की, त्या वेळच्या नभोवाणी मंत्री बी. व्ही. केसकर यांनी नीरद चौधरींवर राजद्रोहाचा आरोप ठेवला. परिणामी त्यांच्या नोकरीवर गदा आली. शेवटी संतापी स्वभावाच्या चौधरींनी भारत सोडला आणि ते कायमचे इंग्लंडला राहायला गेले. अशा एकेक अर्पणपत्रिकेच्या तऱ्हा, पण आता एक वेगळाच प्रकार पुढे आला आहे. पेचप्रसंगच म्हणा. विशेष म्हणजे त्याबाबत अनुवादक उमा कुलकर्णी यांनी गिरीश कर्नाड यांच्या मृत्यूनंतर जो श्रद्धांजलीपर लेख लिहिला होता, त्यात त्यांनी निर्माण झालेल्या पेचप्रसंगाबाबत खुलासा केला होता, पण त्याकडे कितीजणांचं लक्ष गेलं होतं कुणास ठाऊक? तोच अनुभव त्यांनी यंदाच्या ग्राहकहित दिवाळी अंकात सांगितलेला आहे (शब्दांकनः स्वाती प्रभू मिराशी).

‘उबदार सोबत आणि संचिताचा आंतर प्रवाह’ या लेखात त्यांनी एकूणच आपल्या अनुवाद कारकीर्दीबाबत आढावा घेतलेला आहे. त्यात त्या म्हणतात, “या लेखनाच्या निमित्ताने काही अनुभव मला कमालीची वेगळी जाणीव करून देणारे ठरले. त्यापैकी एक महत्त्वाचा अनुभव आहे, गिरीश कर्नाड यांच्या आत्मकथनाच्या संदर्भातला. हा अनुवाद मी केला आणि त्यानिमित्ताने एक वेगळी जाणीव मला झाली. झालं असं, कर्नाडांच्या ‘खेळता खेळता आयुष्य’ या आत्मकथनाची अर्पणपत्रिका फार भन्नाट आहे आणि त्यामुळे ती वाचकांना फार आवडून जाते. त्यांनी ते कथन डॉ. मधुमालती गुणे यांना अर्पण केले आहे. त्यात ते लिहितात की, तीन मुलं झाली आता मूल नको, असं आईला वाटत होतं आणि त्यामुळे माझ्या वेळच्या गर्भारपणात आई आणि बाबा डॉ.  मधुमालती गुणे नावाच्या पुण्याच्या डॉक्टरीणबाईकडे गेले होते. डॉ. गुणे यांना निरोप दिला असता त्यांनी “येते’’ सांगितले, परंतु काही कारणांनी त्या आल्याच नाहीत. हे दोघं तासभर वाट बघून निघून आले आणि पुन्हा तिकडे गेलेच नाहीत. जर दिलेल्या शब्दानुसार डॉक्टरीण बाई क्लिनिकला आल्या असत्या तर ही आत्मकथाच नव्हे तर ती लिहिणारा मी ‘प्रथम पुरुष’ही असलो नसतो. त्यामुळे या सगळ्या अस्तित्वाला कारणीभूत असलेल्या त्या डा. मधुमालती गुणे यांच्या स्मृतीला मी ही आत्मकथा अर्पण करीत आहे.’’

उमा कुलकर्णी सांगतात, ‘हे सगळं झालं आणि एक दिवस सुमनताई किर्लोस्कर यांची आणि माझी काही कारणांनी भेट झाली. त्या मला म्हणाल्या, “मी तुझं ते पुस्तक वाचलं. मला बरं वाटलं.’’ मी त्यावर म्हटलं की, “त्याची अर्पणपत्रिका काय भन्नाट आहे ना!’’ त्यावर त्या म्हणाल्या की, “हो, पण त्यामुळे डॉ. मधुमालती गुणे यांची मुलगी फार नाराज झाली.’’ हे ऐकून मी जरा सावध झाले. त्यांचं म्हणणं नीट ऐकलं. झालं असं की, डॉ. गुणे यांची मुलगी ही स्त्रीरोग प्रसूतीतज्ञ आहे. त्या सुमनताईंना म्हणाल्या की, “कर्नाडांनी असं का बरं लिहिलं? माझी आई असं काम करणारी डॉक्टर नव्हती.’’ त्या दुखावल्या. कारण कर्नाडांच्या जन्माच्या वेळच्या काळी गर्भपात करायला कायद्याची मान्यता नव्हती. बेकायदेशीर काम होतं ते. वाईट प्रकरणं, भानगडी मिटवण्याचं काम गुपचूप करणारे काही डॉक्टर तेव्हाही होते. पण या डॉक्टर तशा नव्हत्या आणि म्हणून त्यांची मुलगी या लिहिण्यामुळे खूप दुखावली गेली. पण ही वेळ अशी होती की, मी फार काही करू शकणार नव्हते. कर्नाड तर गेले होते. मग मी जेव्हा कर्नाड यांच्यावर लेख लिहिला त्यात खुलासा केला. सुमनताईंकडून हा निरोप मी त्यांना पोहोचवला. मी स्वतही त्यांच्याशी बोलले. तेव्हा त्या म्हणाल्या की, “माझी आई जरी वेळेवर दवाखान्यात आली असती तरी कर्नाडांच्या जिवाला धोका नव्हता. घरात सात-आठ मुलं असणाऱया त्या काळात माझी आई असं काम करणारी नव्हती. ही सगळी गोष्ट मला चटका लावणारी झाली. कर्नाड असताना हे मला कळलं असतं तर मी त्यांच्याशी बोलले असते आणि हा असा अर्थ निघतो आहे हे त्यांना सांगितलं असतं.’’

याबाबत ऊमा कुलकर्णी म्हणतात, “कर्नाड हा राजा माणूस होता. त्यांनी डॉ. गुणे यांच्या मुलीची क्षमा मागितली असती. मराठीपुरतं काही केलं असतं, पण आता याला काही इलाज नाही. या अशा गोष्टी नकळत घडत जातात आणि दुखरेपणा निर्माण होतो. एका अर्थाने ही घटना लेखक, अनुवादक यांना दृष्टी देणारी व शिकवण ठरलेली आहे.’’ पेच आहे खरा, पण प्रश्न असा आहे की, या पुस्तकाची नवी आवृत्ती निघाली तर काय करायचं?

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.