भाजी विकणाऱ्याचा मुलगा, MMPSC च्या पहिल्याच प्रयत्नात झाला अधिकारी
GH News January 19, 2025 05:10 PM

मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाने शनिवारी राज्यसेवा परीक्षा 2022 चा अंतिम निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेत देवास येथील रहिवासी असलेली दीपिका पाटीदार ही प्रथम आली आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांच्या घरी अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या सगळ्यात मात्र सर्वत्र एका नावाची चर्चा सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे. भोपाळ येथील रहिवासी असलेल्या आशिष सिंह चौहान याने लोकसेवा आयोगाच्या अंतिम परीक्षेत 841 गुण मिळाले असून त्याला शिक्षण विभागात सहाय्यक संचालक पद मिळाले आहे.

आशिष अत्यंत गरीब घरातला असून त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नाही. आशिषचे वडील अजब सिंग हे भोपाळच्या संत हिरदारामनगर मध्ये भाजीचा स्टॉल चालवतात. आशिष त्याच्या कुटुंबासोबत एका भाड्याच्या घरात राहतो. आशिषचे शालेय शिक्षण सरकारी मॉडेल स्कूल बैरागड येथे झाले आणि त्यानंतर त्याने उच्च शिक्षण सरकारी हमीदिया कॉलेजमधून पदवी आणि पदव्युत्तरचे शिक्षण पूर्ण केले. आशिषला एक भाऊ देखील आहे जो बैरागड येथील साडीच्या दुकानात सेल्समनचे काम करतो. सध्या आशिष इंदूरमधून पीएचडी करत आहे.

कुटुंबीयांनी दिले प्रोत्साहन

एका वृत्तवाहिनीला बोलताना आशिषने त्याच्या यशाचे श्रेय त्याच्या आई-वडिलांना दिले आहे. आशिषने सांगितले की त्याची घरची आर्थिक परिस्थिती चांगली नाही परंतु असे असताना देखील त्याच्या आई वडिलांनी आणि भावाने त्याला कधीही अभ्यास सोडून काम करण्यास सांगितले नाही. तसेच घरच्यांनी त्याला पुढील शिक्षण घेण्यासाठी नेहमीच प्रोत्साहन दिल्याचे देखील आशिषने सांगितले.

आशिष ने पुढे बोलताना सांगितले की हा त्याचा पहिलाच प्रयत्न होता आणि पहिल्याच प्रयत्नात त्याने हे यश संपादित केले आहे. कोचिंग फीस भरणे इतकी ही त्याची आर्थिक परिस्थिती नव्हती त्यामुळे रोज दहा तास अभ्यास करायचा आणि गरज पडेल तेव्हा त्याच्या कॉलेजच्या शिक्षकांचे आणि इतर वरिष्ठांचे त्याने मार्गदर्शन घेतल्याचे देखील आशिषने सांगितले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.