बीजीबी अन् बीएसएफने केला हस्तक्षेप : तणाव वाढतोय
वर्तमानपत्र / मालदा
पश्चिम बंगालच्या मालदामध्ये बांगलादेश सीमेवर तणाव वाढला आहे. या तणावाचे कारण सीमेनजीक राहणारे ग्रामस्थ आणि शेतकरी यांच्यात झालेला वाद आहे. भारतीय शेतकऱ्यांनी बांगलादेशी नागरिकांवर पिकचोरीचा आरोप केले आहे. सीमेपलिकडून आलेल्या बांगलादेशी समाजकंटकांनी बॉर्डर ऑफ बांगलादेशच्या मदतीने पीक कापून नेल्याचे भारतीय शेतकऱ्यांनी सांगितले आहे. या घटनेमुळे दोन्ही देशांमील तणावपूर्ण संबंध अधिकच बिघडले आहेत. भारत आणि बांगलादेशमधील संबंध मागील वर्षी शेख हसीना सरकार पायउतार झाल्यापासून तणावाला सामोरे जात आहेत.
मालदाच्या सुकदेवपूरमध्ये बांगलादेशी समाजकंटकांनी पिक कापून नेल्याचे वृत्त पसरले. यानंतर शेकडो भारतीय शेतकऱ्यांनी सीमेवर धाव घेत बांगलादेशच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. बांगलादेशचे चपाई-नवाबगंज जिल्ह्यातील रहिवासी देखील भारतीय शेतकऱ्यांना पाहून सीमेनजीक दाखल झाले. तणाव पाहता बीएसएफ आणि बीजीबीने हस्तक्षेप करत जमावाला पांगविण्यासाठी अश्रूधूराचा वापर केला.
सीमेवर दगडफेक
यानंतर दोन्ही देशांच्या ग्रामस्थांदरम्यान दगडफेकही झाल्याचे समजते. बांगलादेशच्या बाजूने दगडफेक सुरू झाली, ज्यात भारतीय शेतकरी आणि बीएसएफचे जवान जखमी झाले. तसेच बांगलादेशमधून काही देसी बॉम्बही फेकले गेल्याचा दावा करण्यात आला आहे. सीमेच्या दोन्ही बाजूला अशाप्रकारे लोक जमण्याचा प्रकार यापूर्वी घडला नव्हता असे स्थानिक अधिकाऱ्यांचे सांगणे आहे. बांगलादेशी समाजकंटकांनी आमच्या शेतातून मक्का, गव्हाचे पिक चोरले आहे. बीजीबी जाणूनबुजून सीमेवर कुंपण उभारण्यास विरोध करत असल्याचा दावा स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे.
कुंपणामुळेही तणाव
सुकदेवपूर एक छोटे गाव असून सीमेनजीक वसलेले हे गाव बीजीबीने सीमेवर कुंपण उभारण्यास आक्षेप घेतल्यावर चर्चेत आले होते. बीजीबीच्या जवानांनी ग्रामस्थांना कुंपण उभारण्यास रोखले हेते. सीमेवरील वाढता तणाव पाहता दोन्ह देशांच्या संबंधांसाठीही आव्हान निर्माण झाले आहे. सरकारने याप्रकरणी हस्तक्षेप करावा असे स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे आहे.