Ujni Dam: उजनीचे पाणी १० फेब्रुवारीला बंद होणार! धरणात सध्या ८१ टक्के पाणी; उन्हाळ्यात शेतीसाठी आणखी दोनदा तर सोलापूर शहरासाठी सुटणार एकदा पाणी
esakal January 20, 2025 04:45 PM

सोलापूर : रब्बी पिकांसाठी ४ जानेवारीपासून उजनी धरणातून पाणी सोडण्यात आले असून यंदाच्या वर्षातील हे पहिले आवर्तन ३५ दिवस सुरू राहील. शेतीसाठी सोडलेले पाणी १० फेब्रुवारी रोजी बंद केले जाणार आहे. सध्या धरणात ४३.५० टीएमसी (८१ टक्के) पाणी आहे.

सोलापूर जिल्ह्यातील साडेचार लाख हेक्टरवर यंदा रब्बीची पेरणी झाली आहे. उजनीच्या पाण्याचा आधार दीड लाख हेक्टरला आहे. यंदाच्या पावसाळ्यात उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरले. १ ते १९ जानेवारीपर्यंत धरणातील पावणेआठ तर मागील अडीच महिन्यात साडेपंधरा टीएमसी पाणी कमी झाले आहे. सोलापूर शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी नुकतेच भीमा नदीतून साडेपाच टीएमसी पाणी सोडण्यात आले होते. त्यानंतर आता शेतीसाठी रब्बी हंगामातील पहिले आवर्तन सोडले आहे.

दरम्यान, सोलापूर-उजनी समांतर जलवाहिनीचे काम अजून पूर्ण झाले नसून ती जलवाहिनी कार्यान्वित होण्यासाठी आणखी काही महिन्यांची वाट पहावी लागणार आहे. त्यामुळे आणखी एकदा भीमा नदीतून सोलापूर शहरासाठी पाणी सोडले जाईल. तर धरणातील पाणीसाठा उणे २० टक्के होईपर्यंत कालव्यामधून शेतीसाठी पाणी सोडता येते. उन्हाळ्यात मार्चअखेर व मे महिन्यात अशी दोन आवर्तने शेतीसाठी सोडावे लागतील, जेणेकरून शेतकऱ्यांना टंचाईच्या झळा बसणार नाहीत. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यतेखालील बैठकीत त्यादृष्टीने नियोजन झाले आहे.

धरणातून सध्या सोडलेले पाणी

  • कालव्यामधून : २५०० क्युसेक

  • बोगद्यातून : ३०० क्युसेक

  • सीना-माढा उपसा सिंचन योजना : १६० क्युसेक

  • दहिगाव उपसा सिंचन योजना : ८० क्युसेक

सोलापूर शहरासाठी आणखी एक आवर्तन

सोलापूर ते उजनी या ११० किमी समांतर जलवाहिनीच्या कामाची मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत होती, तरीदेखील काम पूर्ण होण्यासाठी फेब्रुवारी उजाडणार आहे. टेंभुर्णी बायपासजवळील काम आता सुरू झाले आहे, पण वडाचीवाडी व देवडीजवळ राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळ (एनएचएआय) व शेतकऱ्याचा वाद न मिटल्याने महापालिकाच आता तेथील शेतकऱ्यांना मोबदला देऊन जलवाहिनीचे काम पूर्ण करणार आहे. काम पूर्ण झाल्यावर दोन-तीन महिने प्रात्यक्षिक (ट्रायल) होईल. त्यानंतर त्यातून सोलापूर शहरासाठी नियमित पाणी उपसा सुरू होईल. तोपर्यंत आणखी एकदा उजनीतून भीमा नदीद्वारे औज-चिंचपूर बंधाऱ्यात पाणी सोडावे लागणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.