- rat१९p३४.jpg-
२५N३९७९६
काळी मिरी
कोकणी शेतकरी काळ्या मिरीच्या लागवडीकडे वळतोय
प्रक्रिया करुन मसाला उत्पादन ; किलोला सहाशे रुपयांचा भाव
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. २० ः बागेमध्ये आंतरपिक म्हणुन काळ्या मिरीची लागवड फायदेशीर ठरत असून कोकणातील शेतकरी या लागवडीतुन आर्थिक स्थैर्य प्राप्त करीत आहेत. काळ्या मिरीचा उल्लेख मसाला पिकांचा राजा असा केला जातो. आंबा पिकात जसा हापूसचा उल्लेख कोकणचा राजा असा केला जातो त्याप्रमाणे मसाला पिकातील राजा असणा-या काळ्या मिरीची कोकण विभागातील लागवड दिवसेंदिवस वाढत आहे.
कोकणचा विचार करता येथे सुपारी आणि नारळाची लागवड मोठ्या प्रमाणावर आहे. या लागवडींच्या आगरात आंतरपिक म्हणून पूर्वीपासून काळ्या मिरीची लागवड केली जात आहे.मात्र पूर्वी होणारी लागवड घरगुती उपयोगासाठी अधिक होती कालांतराने यात बदल होत याला व्यावसायिक स्थान मिळत गेले. काळ्या मिरीचे वेल उंच वाढत जाण्यासाठी सुपारी, नारळ, रायवळ आंबा अशा उंच वाढणा-या झाडांची गरज असते. एका झाडाजवळ दोन वेल लावल्यानंतर त्यांची उचित वाढ झाली की, या दोन वेलांपासून सुमारे पाच ते सहा किलो हिरवी मिरी मिळते. हिरवी मिरी वाळवल्यानंतर सहा किलो मिरीपासून दीड किलो काळी मिरी तयार होते. हिरव्या मिरीपासून काळी मिरी तयार करण्याचा खटाटोप मोठा आहे. हिरवी मिरी उन्हात वाळवावी लागते नंतर त्यावर गरम पाणी ओतुन त्याचे काळ्या मिरीत रुपांतर होते. ज्या शेतक-यांना झटपट पैसे मिळवायचे आहेत, ते हिरवी मिरी विकणेच अधिक पसंत करतात. मात्र आवश्यक प्रक्रीया करुन काळी मिरी तयार केली, तर किलोला सहाशे रुपयांचा भाव मिळतो. कोकणात शिमगोत्सवापूर्वी काळ्या मिरीचे उत्पादन घेतले जाते यामुळे या उत्सवासाठी शेतक-यांच्या हाती मोठी रक्कम पडते. महाराष्ट्रात मिरीचे उल्लेखनीय उत्पादन घेणारा भाग म्हणून कोकणची ओळख आहे. मिरीचे अधिकाधिक उत्पादन मिळावे म्हणून कोकण कृषी विद्यापिठाने पन्नीयुर एक ही जात विकसित केली असून पन्नीयुर दोन ते पाच या जातींचाही कोकण कृषी विद्यापीठात अभ्यास सुरु आहे.
---
कोट
हिरवी अथवा काळी या दोन्ही उत्पादनापासून शेतकरी चांगले आर्थिक स्थैर्य प्राप्त करु शकतो. कोकणातील शेतक-यांनी नारळी पोफळीच्या आगरात मिरीची लागवड करुन आंतरपिक म्हणून याचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेतल्यास शेतक-यांना केवळ एकाच पिकावर अवलंबुन रहावे लागणार नाही. काळी मिरी प्रक्रीया करुन तयार झाल्या नंतर दर्जानुसार किलोचा दर अधिकाधिक एक हजार ते बाराशे रुपये किलो एवढा आहे. सांडपाण्यावरही वाढणा-या मिरी लागवडीचे कोकणात वाढत असणारे क्षेत्र निश्चितच अभिनंदनीय आहे.
- गंगाधर ढोल्ये, असुर्डे, प्रयोगशिल शेतकरी